Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर निर्णय घेतले. पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून ४८ तासांत मायदेशी निघून जावे, असा आदेश देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन करून एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, याची खातरजमा करण्यास सांगितले. एकीकडून भारत पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले जात असून, दुसरीकडे देशभरात या हल्ल्यानंतर तीव्र संताप असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात निषेध नोंदवला. तसेच स्वाक्षरी मोहीम राबवली.
मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील दहशतादी हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाने विविध ठिकाणी आंदोलन केले. तसेच, ‘पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय’ असा ठळक आशय असलेल्या फलकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वाक्षरी मोहिमेसाठी रेल्वे स्थानक परिसर, तसेच बाजारांच्या दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत.
पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग व्हायलाच पाहिजे ही मागणी ठामपणे मांडण्यात आली
पहलगाम येथे निष्पाप भारतीय नागरिकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे गेले २ दिवस महाराष्ट्रभर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले, अतिरेक्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांचा निषेध करण्यात आला. जनतेच्या मनात असलेला राग, प्रतिशोध घेण्याची भावना आणि पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग व्हायलाच पाहिजे ही मागणी ठामपणे मांडण्यात आली. देशावर ओढवलेल्या ह्या दुःखद प्रसंगात आम्ही भारत सरकारसोबत ठाम उभे आहोत. दहशतवादाविरोधात जो काही निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाईल, त्याला आमचा पाठिंबा आहे. कारण आता बदला घ्यायची वेळ आलीय! पाकधार्जिण्या अतिरेक्यांचा कणा आता मोडलाच पाहिजे!, अशी एक पोस्ट ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. तसेच, आंदोलनेही करण्यात येत आहेत. दहशतवाद्यांविरोधात भारत सरकारनेही कठोर पावले उचलायला सुरुवात केली असून पाकिस्तानवर विविध निर्बंध लादून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.