Taking cue from Tokyo, South Korea, BMC mulls underground ponds to store excess rainwater | पूर बोगदे करणार तुंबईतून सुटका; मुंबईत राबवला जाणार 'टोकियो पॅटर्न'

पूर बोगदे करणार तुंबईतून सुटका; मुंबईत राबवला जाणार 'टोकियो पॅटर्न'

- शेफाली परब-पंडित

मुंबई : पूरमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्यानंतरही दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबापुरी होते. यावर्षी तर दक्षिण मुंबईत कधीही न तुंबलेल्या ठिकाणीही पाणी भरले. त्यामुळे टोकियो शहराच्या धर्तीवर पूर बोगद्याद्वारे पावसाचे पाणी अडविण्याचा प्रयोग महापालिका करणार आहे. याबाबत बुधवारी जपानच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पालिका प्रशासनाची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय विमान प्रवास सुरू झाल्यानंतर जपानचे पथक मुंबईत येणार आहे.

५ आॅगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. विशेषत: दक्षिण मुंबईमध्ये जास्त वेळ पाणी तुंबून राहिले. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत महापालिकेने मुंबईतील पर्जन्यवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि. मी. एवढी केली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत तासाभरात शंभर मि. मी.हून अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पुराचा धोका कायम असल्याने टोकियोप्रमाणेच मुंबईतही पूर बोगद्याद्वारे पावसाचे पाणी साठवण्याचा प्रस्ताव सप्टेंबर २०१८ मध्ये चर्चेत आला. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये जपानमधील तज्ज्ञ मुंबईत येऊन पाहणी करणार होते.

मात्र कोरोनाचा प्रसार जगभर सुरू झाल्यानंतर हा दौरा रद्द झाला. त्यामुळे पूर बोगद्याचा प्रस्तावही गेले सहा महिने रखडला आहे. परंतु, ग्लोबल वॉर्मिंगमुळे गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचा कलही बदलला आहे. अनेक वेळा कमी तासांमध्ये जास्त पाऊस होत असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईत काही तासांतच तीनशे मि.मी.हून होऊन अधिक पाऊस झाला. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून नेण्याची पर्जन्य वाहिन्यांची क्षमता आणखीन वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर टोकियोप्रमाणे पावसाचे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवून पाऊस थांबल्यानंतर पुराचे पाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे.

यासाठी प्रकल्पाला प्राधान्य
अनेक उपाययोजना केल्यानंतरही मुंबईत पाणी तुंबतेच. त्यामुळे जगभरात राबवल्या जाणाºया उपाययोजनांचा आढावा पालिकेने घेतला. यामध्ये जपानमधील टोकियो शहर, जलबोगदा प्रकल्पामुळे पूरमुक्त झाल्याचे आढळून आले.

शहराची भौगोलिक स्थिती आणि समुद्राला भरती असल्यास मुंबई मुसळधार पावसात पाण्याखाली जाते. गेल्या वर्षी पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. यावर्षीही जुलै आणि आॅगस्ट महिन्यात मुंबईची तुंबापुरी झाली होती.
भूमिगत जलबोगदा उपक्रमासाठी जपानी तज्ज्ञांनी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत पवई, विहार, तुळशी तलाव आणि मिठी नदीचा अभ्यास दौरा गेल्या वर्षी केला होता.

पुराचे पाणी रोखण्यासाठी टोकियोमध्ये केलेल्या प्रयोगाचा अभ्यास करण्यासाठी गेल्या वर्षी पालिका अधिकाºयांचे पथक जपानला गेले होते. त्यानुसार चर्चा झाल्यानंतर जपानच्या पथकाने मुंबईत येऊन पाहणी केल्यानंतर सामंजस्य करार केला जाणार होता. मधल्या काळात हा प्रस्ताव लांबणीवर पडला. याबाबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकाºयांशी चर्चा झाली आहे. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे भूमिगत पाणी साठविण्यासाठी सल्लागार नेमणे आदी कामे सुरू होतील.
- पी. वेलारासू, अतिरिक्त आयुक्त महापालिका

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taking cue from Tokyo, South Korea, BMC mulls underground ponds to store excess rainwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.