Join us
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजीची काळजी घेत भाजपने नेमले प्रभारी; २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रभारींची फौज तैनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 10:11 IST

पक्षांतर्गत गटबाजीची काळजी घेत भाजपने सर्व २९ महापालिकांमध्ये निवडणूक प्रभारी नेमले आहेत.

मुंबई : पक्षांतर्गत गटबाजीची काळजी घेत भाजपने सर्व २९ महापालिकांमध्ये निवडणूक प्रभारी नेमले आहेत. नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर आदी ठिकाणी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी नेमताना विशेष काळजी घेतली आहे.

नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक आणि आ. मंदा म्हात्रे यांच्यातून विस्तव जात नाही. त्यांच्यापैकी कोणालाही संधी न देता विधान परिषदेचे सदस्य विक्रांत पाटील यांना प्रभारी नेमले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्ती अशी पाटील यांची ओळख आहे.

सोलापूरमध्ये माजी मंत्री सुभाष देशमुख विरुद्ध माजी राज्यमंत्री विजय देशमुख असा वाद अनेक वर्षे राहिला पण आता दोघे एकत्र आहेत. त्यामुळे सोलापूरचे आमदार असलेल्या या दोघांपैकी एकाला संधी दिली जाईल, असे मानले जात असताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रभारी तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवडणूक प्रमुख नेमले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बाहेरच्यांची भाजपमध्ये मोठी आयात चालविली असल्याने आणि काही पक्षांतर्गत नियुक्त्यांवरून दोन देशमुख अस्वस्थ आहेत.

वसई-विरारमध्ये ठाकुरांसमोर मंत्री नितेश राणेंना प्रभारी केले आहे.

नांदेडमध्ये चव्हाणांच्या मदतीला पंकजा मुंडे

चंद्रपूरमध्ये माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील संबंध आधीच ताणले गेले आहेत. तेथे माजी खासदार अशोक नेते यांना निवडणूक प्रभारी तर माजी खासदार अजय संचेती यांना निवडणूक प्रमुख नेमण्यात आले आहे. नांदेड महापालिकेत भाजपची सर्व सूत्रे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आहेत. तेथे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक प्रभारीपद तर अशोक चव्हाण यांना निवडणूक प्रमुखपद देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील नेते गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये प्रभारी नेमताना त्यांचे समर्थक आ. मंगेश चव्हाण यांना जळगावमध्ये प्रभारी केले आहे. लातूरमध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे प्रभारी तर माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर निवडणूक प्रमुख आहेत.

स्थानिक नेत्यांनाही संधी

काही ठिकाणी स्थानिक नेत्यांना प्रभारी नेमले आहे. त्यात राज्यमंत्री मेघना बोडींकर परभणी, आ. प्रवीण दटके -नागपूर, मंत्री अतुल सावे - छत्रपती संभाजीनगर, रावसाहेब दानवे - जालना, आ. रणधीर सावरकर अकोला, रामशेठ ठाकूर - पनवेल, कुमार आयलानी -उल्हासनगर यांचा समावेश आहे.

टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६भाजपा