घ्या... राजावाडी उद्यानाची अवघ्या वर्षभरातच दुर्दशा; चार कोटींचा निधी खर्च : १३० ज्येष्ठांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:43 IST2025-10-11T10:42:56+5:302025-10-11T10:43:27+5:30
१३० ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक उद्यानात येतात.

घ्या... राजावाडी उद्यानाची अवघ्या वर्षभरातच दुर्दशा; चार कोटींचा निधी खर्च : १३० ज्येष्ठांची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नूतनीकरण करण्यात आलेल्या घाटकोपर पूर्वेतील वल्लभाचार्य राजावाडी उद्यानाची अवघ्या वर्षभरात दुर्दशा झाली आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यानंतर उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले होते. या विकासकामासाठी पालिकेने चार काेटींचा निधी खर्च केला हाेता.
याबाबत १३० ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रार दिली आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक उद्यानात येतात. नूतनीकरणाने काही समस्या सुटल्या, पण अनेक नव्या निर्माण झाल्या. रस्त्यावरील दिवे बंद आहेत, व्यायामाची उपकरणे खराब झाली आहेत. गॅझेबो आणि पॅगोडा येथून पाणी गळते. भटक्या कुत्र्यांमुळे असुरक्षितता निर्माण झाली आहे. पूर्वी झोपाळे होते, ते काढून टाकले आहेत, असे पालिकेतील भाजपचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सांगितले.
ज्येष्ठांना धोका
नूतनीकरणावेळी जलनिस्सारणाच्या समस्येमुळे जमिनीची उंची नऊ इंचांनी वाढविली गेली आणि पायवाटा पुन्हा बांधल्या गेल्या.
पण केवळ वर्षभरातच फरशी सैल झाली आहे आणि ती ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. कामाची गुणवत्ता चांगली नव्हती, असे छेडा म्हणाले.
रोपटी कोमेजून गेली
उद्यानातील रोपटी कोमेजली आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय नाहीशी झाली आहे. काही दिवे बंद आहेत, तर काही झाडांच्या आड लपले आहेत. बागकामाची देखरेख होत नाही, माळी दिसत नाही. भटक्या श्वानांचाही त्रास वाढला आहे. जर कोणी पिशवीत काहीतरी घेऊन आले तर कुत्रे त्यांच्यामागे लागतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. नवे ग्रॅनाइटचे बाक जेथे गरज आहे तेथे ते नाहीत. प्रवेशद्वाराजवळ ड्रेनेज आहे, पण तो खाली असल्याने नागरिक घसरतात.