लोकल प्रवासात मोबाइल सांभाळा ! दर आठवड्याला चोरीच्या १३५ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 11:32 IST2025-07-04T11:31:53+5:302025-07-04T11:32:29+5:30

‘जीआरपी’च्या आकडेवारीनुसार कल्याण आणि कुर्ला स्थानके चोरीच्या घटनांमध्ये आघाडीवर आहेत. मोबाइलची चोरी सामान्यतः गर्दीच्या गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर होते. यापैकी बऱ्याच चोरीच्या घटना एकत्र काम करणाऱ्या छोट्या टोळ्यांकडून केल्या जातात.

Take care of your mobile phone during local travel 135 incidents of theft every week | लोकल प्रवासात मोबाइल सांभाळा ! दर आठवड्याला चोरीच्या १३५ घटना

लोकल प्रवासात मोबाइल सांभाळा ! दर आठवड्याला चोरीच्या १३५ घटना

मुंबई : उपनगरीय लोकलमध्ये दर आठवड्याला साधारण १३५ मोबाइलची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीनुसार २०२२ पासून आतापर्यंत लोकलमध्ये मोबाइल चोरीच्या ३७ हजार ३९८ प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी फक्त १६ हजार १५४ प्रकरणे निकाली काढली आहेत.

‘जीआरपी’च्या आकडेवारीनुसार कल्याण आणि कुर्ला स्थानके चोरीच्या घटनांमध्ये आघाडीवर आहेत. मोबाइलची चोरी सामान्यतः गर्दीच्या गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर होते. यापैकी बऱ्याच चोरीच्या घटना एकत्र काम करणाऱ्या छोट्या टोळ्यांकडून केल्या जातात. अलीकडेच अशाच एका टोळीतील चोराला पकडण्यात आले आहे. हा एकटा अनेक फोन चोरत असल्याने त्याला पकडल्यामुळे या घटना काहीशा कमी झाल्याचे जीआरपी गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बहुतेक पीडितांना त्यांचा मोबाइल ट्रेनमधून बाहेर पडल्यानंतरच चोरीला गेल्याचे लक्षात येते. त्यामुळे चोरी कुठे झाली हे नेमके ठिकाण शोधणे कठीण होते. पीडितांना मोबाइल हरवल्याचे लक्षात आल्यावर आम्ही त्या स्टेशनवर एफआयआर नोंदवून घेतो आणि तिथून तपास केला जातो. २०२३ मध्ये १२,९८९ फोन चोरीच्या घटना घडल्या असून त्यापैकी आतापर्यंत ५४२२ गुन्हे सोडवले गेले आहेत. २०२५ मध्ये ३५०८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. म्हणजेच दर आठवड्याला सरासरी १३५ चोरीच्या घटना घडतात असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डेटा चोरीची भीती

मोबाइल चोरीनंतर अनेकदा त्यामधल्या डेटा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची भीती असते. मोबाइलमध्ये बँकेसह खासगी बाबी असल्याने ही गंभीर समस्या असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बहुतेक लहान चोरांना डेटा कसा काढायचा हे माहीत नसते. ते फक्त सेकंडहँड मार्केटमध्ये फोन विकतात. विशेषतः आयफोनची पुनर्विक्री किंमत जास्त असते; परंतु जेव्हा मोठे रॅकेट असते तेव्हा डेटा चोरीदेखील एक समस्या आहे.

 आम्ही पीडितांना सर्व कार्ड, खाती त्वरित ब्लॉक करण्याचा आणि पासवर्ड बदलण्याचा सल्ला देतो, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Take care of your mobile phone during local travel 135 incidents of theft every week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल