Join us  

"कोरोनाचं संकट दूर कर, कोरोना योद्ध्यांचे संरक्षण कर, महाराष्ट्राचं भलं कर" उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विठूरायाला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 7:27 PM

सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

मुंबई -  “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोना योद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं असून, महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, अशी आळवणी भगवंत विठ्ठलाकडे केली आहे. पंढरपुरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं कायम राखली गेली. संतांच्या पादूका परंपरेनुसार पंढरपूरला पोहचल्या, याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून, आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे. त्यांचे आभार मानले आहेत. पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार झालेलं असेल आणि पुन्हा आपण नाचत, गाजत पंढरपूरची वारी करु, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेनं अधिक काळजी घ्यावी. असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्रपंढरपूर वारीपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर