पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:49 IST2025-10-27T06:49:13+5:302025-10-27T06:49:46+5:30
हा पूल पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील एस व्ही रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार आहे.

पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
मुंबई : पश्चिम उपनगरांतील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेऊन मुंबई पालिकेच्या पूल विभागाकडून गोरगाव ते ओशिवरा आधुनिक केबल-स्टेड प्रकारातील पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलासाठी तब्बल ४१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या पुलाचे काम वेगाने पूर्ण करून तो २०२८ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील एस व्ही रोड आणि लिंक रोडवरील वाहतूक कोंडी फुटणार आहे.
केबल-स्टेड डिझाइनमुळे पुलाचा मोठा स्पॅन बळकट केबल्समधून आधारला जाईल. त्यामुळे पूल अधिक मजबूत होईल, तसेच त्याचे सौंदर्यही वाढेल. या पुलाद्वारे ओशिवरा-गोरगाव परिसरातील वाहतूक प्रवाहाला नवी दिशा मिळणार आहे. परिसरातील व्यावसायिक कार्यालये, नवे गृहनिर्माण प्रकल्प आणि चित्रपट-वेब मनोरंजन क्षेत्रासाठी हब मानला जाणारा ओशिवरा-लोखंडवाला हा पट्टा या पुलामुळे एसव्ही रोडमार्गे अधिक सुलभतेने जोडला जाईल. वेळ वाचेल आणि इंधनबचतही होईल.
...म्हणून प्रकल्पाच्या मंजुरीला विलंब
खारफुटीचे संवर्धन, पर्यावरणीय परवाने, तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरी नियोजन या प्रक्रिया अधिक वेळखाऊ ठरल्या. त्यामुळे प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी वेळ लागल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. अखेर मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाल्याने पालिकेने आता कामकाज हाती घेण्याची तयारी पूर्ण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पुलाचे बांधकाम आणि संरचना हे दक्षिण मुंबईतील काही महत्त्वाच्या पुलांच्या धर्तीवर असेल. त्यामुळे भविष्यात हा पूल पश्चिम उपनगरातील नवीन लँडमार्क ठरेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
तसेच, पुलाला जोडून होणाऱ्या ट्रॅफिक पुनर्रचनेत पादचारी सुरक्षेची तरतूद, बस/टॅक्सी स्टॉपचे स्थानांतर, पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण आराखड्यांत बदल अशा अनेक पूरक उपाययोजनादेखील अंमलात आणल्या लागणार आहेत.
अशी असेल पुलाची रचना
५४२ मीटर इतकी या पुलाची लांबी असेल.
२८.५५ मीटर रुंदी असेल.
६ मार्गिका असतील, तर ३ मार्गिका दोन्ही दिशांना रहदारीसाठी खुल्या असतील.
३६.६ मीटर रुंदीच्या शहर विकास आराखड्यातील रस्त्याशी पुलाला जोडणी दिली जाईल.