मास्क साठेबाजांवर कारवाई करा; ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 04:42 IST2020-03-13T04:42:12+5:302020-03-13T04:42:27+5:30
बाजारात प्रमाणित कंपन्यांच्या सॅनिटायझरचा, हॅण्डवॉशचा तुटवडा आहे. याचा गैरफायदा घेत बोगस सॅनिटायझर आणि बोगस हॅण्डवॉश बाजारात दाखल केले जात आहे.

मास्क साठेबाजांवर कारवाई करा; ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनची मागणी
मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘मास्क’ची साठेबाजी रोखण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने ‘एन ९५ मास्क’च्या विक्रीवर निर्बंध आणले आहेत. मात्र तरीही मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात असूनही उपलब्धता नसल्याने साठा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आॅल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनने वैधमापन शास्त्र विभागाकडे केली आहे. त्यामुळे आता या मास्क साठेबाजांवर आणि अतिरिक्त दर आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क आणि वैयक्तिक सुरक्षा साधने (पीपीई) यांची विक्री करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. या मास्कपेक्षा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करणे योग्य आहे, असे राज्याच्या आरोग्य विभागानेच स्पष्ट केले आहे. तरीही आता मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरांत कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, नागरिकांची सॅनिटायझर आणि मास्क घेण्यासाठी केमिस्टच्या दुकानांत गर्दी वाढताना दिसत आहे. काही केमिस्ट याचा फायदा घेत २० रुपयांचे मास्क ३०० रुपयांना विकत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे प्रकरण गंभीर असून याची त्वरित दखल घेण्याची मागणी आॅल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे.
साबणाने हात धुणे हाच योग्य पर्याय
मास्कच्या तुटवड्याबाबत चुकीचे संदेश पसरविले जात आहेत. हे मास्क केवळ वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनीच वापरणे अपेक्षित आहे. त्यामुळे खुल्या बाजारात हे मास्क उपलब्ध नाहीत, यावरून असुरक्षिततचे वातावरण निर्माण केले जात आहे. नागरिकांनी मास्कपेक्षा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करणे योग्य आहे. वापरलेल्या मास्कची विशिष्ट पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे; परंतु आपण ते कचºयात फेकतो.
कचरा गोळा करणारी मुले, व्यक्ती यांना यातून संसर्ग होण्याचा धोका आहे. तेव्हा निर्जंतुकीकरणासाठी साबणाने हात धुणे हाच योग्य पर्याय आहे. पाणी उपलब्ध नसलेल्या भागांत सॅनिटायझर वापरले जाते. परंतु आपल्याकडे त्याची फारशी आवश्यकता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता साबणाचा वापर करावा, मास्कऐवजी रुमाल वापरावा, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य जयेश लेले यांनी सांगितले.
लाखोंचे बनावट सॅनिटायझर जप्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी सतर्कता बाळगण्यात येत असून, सॅनिटायझर आणि मास्क खरेदी करण्यासाठी मेडिकलवर गर्दी होत आहे. मात्र ग्राहकांच्या हाती बनावट साहित्य पडत आहे. याविरोधात प्रशासन सज्ज झाले आहे. अशा प्रकरणात कारवाईअंतर्गत मुंबईतून लाखोंचे बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली.
बाजारात प्रमाणित कंपन्यांच्या सॅनिटायझरचा, हॅण्डवॉशचा तुटवडा आहे. याचा गैरफायदा घेत बोगस सॅनिटायझर आणि बोगस हॅण्डवॉश बाजारात दाखल केले जात आहे. गेल्या ८ दिवसांत ‘मेड इन वाकोला’, ‘मेड इन चारकोप’ अशी सॅनिटायझर ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत. अशा प्रकारची सॅनिटायझर तयार करण्यासाठी निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला जात आहे. याची माहिती मिळताच प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून, १ लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, उत्पादनावर रजिस्ट्रेशन नंबर, लायसन्स नंबर, बॅच नंबर असणे गरजेचे आहे.