‘महिला स्वयंसिद्धी’साठी १० लाखांपर्यंत घ्या कर्ज; आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती जाणून घ्या..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 14:01 IST2025-09-28T13:58:54+5:302025-09-28T14:01:44+5:30
इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परित्यक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकारतर्फे महिला स्वयंसिद्धी योजना राबविण्यात येते.

‘महिला स्वयंसिद्धी’साठी १० लाखांपर्यंत घ्या कर्ज; आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती जाणून घ्या..
मुंबई : इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परित्यक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्यासाठी राज्य सरकारतर्फे महिला स्वयंसिद्धी योजना राबविण्यात येते. त्याअंतर्गत महिलांना विविध प्रकारच्या उद्योगांसाठी ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच कर्जावर १२ टक्के दराने व्याजाचा परतावा दिला जातो. ही योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालित केंद्राच्या साहाय्याने राबविण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आदी अधिकृत ओळखीचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र, वयाची पडताळणी करण्यासाठी वयोमर्यादा प्रमाणपत्र तसेच इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र, बँकेच्या कर्ज मंजुरीचे पत्र, कर्जाची रक्कम व संबंधित कागदपत्रे आदी कर्जासाठी लागणारा तपशील, बचत गटाची सर्व संबंधित आवश्यक कागदपत्रे.
अशा प्रकारे देण्यात येताे व्याजदराचा परतावा
महिला बचत गटातील इतर मागासप्रवर्गाच्या महिला अर्जदारांना व्याज परताव्याचा लाभ ओबीसी महामंडळाकडून दिला जातो. बचत गटातील उर्वरित महिलांना महामंडळाकडून इतर शासकीय विभाग, महामंडळाच्या योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.
व्यवसायाची संधी कुठे ?
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, फळे, भाजीपाला, ॲल्युमिनियम फॅब्रिक शॉप, ऑटो स्पेअर पार्टस, टेलरिंग युनिट, हार्डवेअर, पेंट शॉप, लाकडी वस्तू बनवणे, वीटभट्टी, ग्लास व फोटोफ्रेम सेंटर आदी व्यवसायासाठी संधी आहे.
योजनेसाठी अटी, पात्रता
> अर्जदार महिला राज्यातील रहिवासी असावी. तिचे वय १८ ते ६० दरम्यान असावे.
> अर्जदार गरीब रेषेखालील किंवा मध्यम उत्पन्न वर्गातील असावी.
> अनुसूचित जाती / जमाती / मागासवर्गातील असल्यास प्राधान्य.
अर्ज कुठे करावा?
महिलेने स्वतःच्या जात प्रमाणपत्रातील नमूद जातीनुसार मुख्य कंपनी, उपकंपनी यापैकी लागू होणाऱ्या महामंडळांतर्गत ऑनलाइन योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदाराने ऑफलाइन स्वरूपात अर्ज करता येतो.
सध्या नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिलांना व्यवसायासाठी कर्ज देऊन सक्षम करण्यावर भर आहे. त्याकरिता योजनेचा प्रचार व प्रसार करणे, महिलांसाठी ठिकठिकाणी शिबिरे घेणे, हेल्पडेस्क सुरू करणे, ग्रामीण भागात आवश्यक ती आर्थिक मदत आणि प्रशिक्षणासाठी राज्यातील गावागावांत बचतगट उभारण्यासाठी महिलांचे प्रबोधन करणे यादृष्टीने उपाययोजना केली जात आहे.
सुनीता नागरे, संस्थापक, अभिषेक सामाजिक शैक्षणिक संस्था, अंधेरी