Join us  

मुंबई महानगरातल्या तीन लाख घरांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 5:29 PM

सुमारे एक लाख तयार घरे ग्राहकांच्या प्रतीक्षेत; बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील घरांचीही चिंता

 

मुंबई : बांधकाम पूर्ण झालेली सुमारे एक लाख घरेमुंबई महानगर क्षेत्रात खरेदीदारांच्या प्रतीक्षेत असतानाच त्यात सध्या बांधकाम सुरू असलेली तब्बल २ लाख १० हजार घरांची घर येत्या दोन वर्षांत पडणार आहे. कोरोनापाठोपाठ दाखल झालेल्या आर्थिक मंदीमुळे या तीन लाख घरांची विक्रीवर मोठे संकट उभे ठाकले आहे. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये अशा घरांची संख्या ८ लाख ७८ हजार आहे.   

अँनराँक प्राँपर्टीज या नामांकित संस्थेने ही आकडेवारी संकलित केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात २०२० अखेरीपर्यंत १ लाख ७ हजार आणि २०२१ पर्यंत आणखी १ लाख ३ हजार घरांचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. देशातील सात प्रमुख शहरांमध्ये या वर्षी जवळपास ४ लाख ६६ हजार आणि पुढील वर्षी ४ लाख १२ हजार नवीन घरे बांधून पूर्ण होण्याची चिन्हे होती. त्यात पुण्यातील १ लाख ३६ हजार घरांसह कोलकत्ता (३३,८५०), हैद्राबाद (३०,५००) आणि चेन्नई येथील २४,६५० घरांचा समावेश असल्याची माहिती हाती आली आहे. २०१३ नंतर सुरू झालेले अनेक बांधकाम प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे बांधकाम ठप्प झाले आहे. महारेराने सहा महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे या प्रकल्पांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गृह खरेदीला लागलेली घरघर, आर्थिक कोंडी, गावी परतलेले मजूर अशा असंख्य कारणांमुळे या प्रकल्पांची वाट खडतर आहे. तसेच, या विलंबामुळे या प्रकल्पांमध्ये घर खरेदी केलेल्या ग्राहकांचीसुध्दा मोठी कोंडी होणार आहे.

प्रकल्प पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता जरी विकासकांमध्ये असली तरी अनेक ठिकाणी मजूरच उपलब्ध नसल्याने त्यांना काम सुरू करता येत नाही. तसेच, देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव आजही कायम आहे. बांधकाम व्यवसायाची ही कोंडी दूर करण्यासाठी सरकारने ठोस प्रयत्न करायला हवेत असे मत अँनराँक प्राँपर्टीजच्या अनूज पुरी यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :घरकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई