Join us  

सफाई कर्मचाऱ्यांचा २४ तास कोरोनाशी मुकाबला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 6:11 PM

रेल्वेचे रुग्णालय, रेल्वे परिसराची स्वच्छता सुरु

 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमधील सफाई कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये २४ तास काम करत आहेत. रेल्वेचे रुग्णालय, रेल्वे परिसराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची कामे सुरु आहे.

लॉकडाऊन काळात वैद्यकीय कर्मचारी, पोलीस या कर्मचाऱ्यांसह सफाई कर्मचारी काम करत आहेत. वैद्यकीय कर्मचारी, आरोग्यसेवा व्यावसायिक आणि सफाई कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी लढत आहेत. कोरोना विषाणूची साथ थांबविण्यासाठी सफाई कर्मचारी महत्वाची भूमिका निभावत आहेत. वारंवार हात धुवून व्यक्तिगत स्वच्छता राखली जाते. मात्र परिसराची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत.  

 

 

मध्य रेल्वेने आपल्या वैद्यकीय कर्मचारी, आरोग्य व्यावसायिक आणि स्वच्छताविषयक कामगारांना शिक्षण, प्रेरणा आणि प्रशिक्षण देऊन कोरोनाशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे येथील सर्व विभागीय रूग्णालयांसह भायखळा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयांमधील डॉक्टर्स, पॅरामेडिकल विभाग आणि सफाई कामगार चोवीस तास या विषाणूंविरूद्ध लढाई लढत आहेत. पॅरामेडिकल विभागाला पीपीई वापराचे परिचालन घटक, निर्जंतुकीकरण पद्धती या बाबींचे प्रशिक्षण दिले आहे.

कोरोनाच्या विरोधातील लढाईत, वैद्यकीय विभागाचे कर्मचारी/ हाउसकिपिंग सहाय्यक आपल्यासाठी सुरक्षेची पहिली फळी आहेत. ते सक्रियपणे रेल्वे परिसर, स्थानके, निवासी वसाहत आणि सार्वजनिक संपर्क स्थळांची सफाई आणि निर्जंतुकीकरण करीत आहेत. देशभर पसरलेल्या कोरोना या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी सर्व उपाय, शिक्षण आणि माहिती अभियान राबवत आहेत. अशा प्रकारे, मध्य रेल्वे वैद्यकीय विभाग आपल्या सक्रिय दृष्टिकोनातून या महामारीमुळे होणार्‍या संभाव्य नुकसानापासून आपल्या कर्मचार्‍यांना वाचवित आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिली आहे. 

------------------------------

रेल्वे रूग्णालयांना मदत करण्यासाठी मध्य रेल्वेच्या कार्यशाळांमध्ये पीपीई, ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणारी ट्रॉली इत्यादींची निर्मिती केली जात आहे. आतापर्यंत ५० ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणारी ट्रॉली परळ कार्यशाळेने बनवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाकडे सुपूर्द केल्या आहेत. 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस