नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 05:17 IST2018-03-21T05:17:58+5:302018-03-21T05:17:58+5:30
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात अधिकार नसताना बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी दिले.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त नगराळे यांना निलंबित करा
मुंबई : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात अधिकार नसताना बँकेचे अध्यक्ष तथा शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि उपायुक्त तुषार दोषी यांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी मंगळवारी दिले.
बँकेने एका कर्जदाराकडून सहकार अधिनियमानुसार वसुलीची कार्यवाही सुरू केली आहे. यावर संबंधित कर्जदाराने बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि वसुली अधिकाऱ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली. याची दखल घेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे व उपायुक्त तुषार दोषी यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आ. जयंत पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधिमंडळ सदस्याविरोधात कारवाई करण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष अथवा सभापतींची परवानगी घ्यावी लागते. किमान तशी माहिती तरी विधिमंडळाला द्यावी लागते. मात्र पोलीस आयुक्तांनी या प्रक्रियेचा अवलंब न करता परस्पर जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामुळे विधिमंडळाच्या अधिकाराचा अधिक्षेप झाला असून त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी शेकापचे पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी केली. त्यावर सभापतींनी दोन्ही अधिकाºयांच्या निलंबनाचे निर्देश सरकारला दिले.