कोविड लसींच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा संशय; डाॅक्टर दाम्पत्यासह १० जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:12 AM2021-06-26T07:12:32+5:302021-06-26T07:12:50+5:30

बोगस लसीकरण; एसआयटी स्थापन, डाॅक्टर दाम्पत्यासह १० आरोपींना अटक

Suspected of giving glucose water under the name of covid vaccine; 10 arrested including doctor couple pdc | कोविड लसींच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा संशय; डाॅक्टर दाम्पत्यासह १० जणांना अटक

कोविड लसींच्या नावाखाली ग्लुकोज पाणी दिल्याचा संशय; डाॅक्टर दाम्पत्यासह १० जणांना अटक

googlenewsNext

मुंबई : बनावट लसीकरण रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणात आतापर्यंत ७ गुन्हे दाखल करत, एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती पाेलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. यात प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीत लसींच्या नावाखाली ग्लुकोजच्या पाण्याचा वापर केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. यात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल गुणांच्या नावाखाली प्रशिक्षण देत त्यांचाही यात वापर करण्यात आला.

कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज येथील लसीकरण घोटाळा उघडकीस आल्यानंतर कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंदवत आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले. तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचसोबत, फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट औषधांसदर्भातील गुन्हे तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कलमांचाही यात समावेश आहे, तर आतापर्यंत याप्रकरणी पटारिया या डाॅक्टर दाम्पत्यासह एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अशाप्रकारे फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईत कांदिवलीसह बोरीवली, वर्सोवा, खार, भोईवाडा, बांगुरनगर पोलीस ठाण्यात एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आलेत. समतानगर आणि अंधेरीतही असे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २००पेक्षा अधिक लोकांचे जवाब नोंदवले आहेत. ११४ बनावट प्रमाणपत्रही जप्त करण्यात आले आहेत.

बनावट लसीकरण प्रकरणातील या टोळीकडून एकूण १ हजार ३४३ लोकांचे बोगस लसीकरण करण्यात आले आहे.  अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये महेंद्र प्रताप सिंह (३९), संजय गुप्ता (२९), चंदन सिंह (३२), नितीन मोंडे (३२), मोहंमद करीम अकबर अली (१९), गुडिया यादव (२४), शिवराज पटारिया (६१), नीता शिवराज पटारिया (६०), श्रीकांत माने (३९) आणि सीमा अहुजा (४२) यांचा समावेश आहे. 

महेंद्र हा नऊ बनावट लसीकरण शिबिरांचा प्रमुख असून, संजय हा सर्व गुन्ह्यात सहआरोपी आहे. राजेश हा कोकिलाबेन रुग्णालयाला सेल्स अधिकारी होता. यातील सहभाग समोर आल्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आले. याशिवाय, चंदन रामसागर हा डेटा सेंटरमधील कर्मचारी आहे. त्याला मॅनेज करून हे सर्व काम सुरू होते. गुडिया यादव, डॉ. पटारिया यांचा सहभागही निश्चित करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्यांचा बारकाईने तपास होणे अपेक्षित असल्याने एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले.

असे करायचे फसवणूक-

एखाद्या कंपनीला किंवा सोसायटीला लसीकरण करून घ्यायचे आहे का, याची माहिती गोळा केल्यानंतर शिबिर आयोजित करून ही टाेळी बनावट लसीकरण करत असे. लसींचा पुरवठा शिवम हॉस्पिटल, चारकोप, कांदिवली येथून केला जात होता. याचे मालक डाॅ. शिवराज पटारिया, त्यांची पत्नी डाॅ. नीता पटारिया आहेत. शिल्लक लसींची माहिती त्यांनी पालिकेला दिलेली नाही. पटारिया दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी महेंद्र सिंह असून, त्यानेच हा सर्व प्लॅन आखल्याचे समाेर आले आहे.

Web Title: Suspected of giving glucose water under the name of covid vaccine; 10 arrested including doctor couple pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.