Sushant Singh Rajput Suicide case Mumbai Police puts hurdles in front of Bihar Police | Sushant Singh Rajput Suicide: 'ती' एक नोट महत्त्वाची ठरणार; बिहार पोलिसांना रिकाम्या हातानं मुंबई सोडावी लागणार?

Sushant Singh Rajput Suicide: 'ती' एक नोट महत्त्वाची ठरणार; बिहार पोलिसांना रिकाम्या हातानं मुंबई सोडावी लागणार?

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलीस विरुद्ध बिहार पोलीस असा थेट संघर्ष निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासावर बिहार पोलिसांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. तर गुन्हा मुंबईत घडला असताना, त्याचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू असताना बाहेरचे पोलीस इथे काय करताहेत, असा सवाल मुंबई पोलिसांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच आता बिहार पोलिसांना जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यातच बिहार पोलिसांनीदेखील मुंबईत येऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं आपण कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं म्हटलं होतं. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनीदेखील काल याच मुद्द्यावर भर दिला होता. या प्रकरणात बिहार पोलीस समांतर तपास करू शकतात का, यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आला. त्याची नोट हाती लागल्याचं वृत्त 'मिरर नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण बिहार पोलिसांच्या हद्दीत येत नाही, असं स्पष्टपणे नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 'मुंबई पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 'फौजदारी कलम संहितेमधील कलम १२ आणि कलम १३ नुसार एखाद्या घटनेचा तपास करण्याचा आणि त्यावर सुनावणी घेण्याचा अधिकार स्थानिक पोलीस आणि न्यायालयाला आहे. त्यामुळे बिहार पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचा कोणताही अधिकार नाही,' असा मजकूर नोटमध्ये आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पाटण्यात एफआयआर नोंदवल्यानं बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत दाखल झाले. त्याऐवजी त्यांनी झीरो एफआयआर नोंदवून प्रकरण मुंबईतल्या योग्य त्या पोलीस ठाण्याकडे सोपवायला हवं होतं, असा उल्लेख नोटमध्ये आहे. 'आम्ही प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रं बिहार पोलिसांकडे हस्तांतरित करणार नाही. कारण त्यांच्या हद्दीत हे प्रकरण घडलेलंच नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे इतर कोणत्याही तपास यंत्रणेकडे चौकशी सोपवण्याचा प्रश्नच येत नाही,' अशी माहिती राज्य सरकारमधील सुत्रांनी दिल्याचं 'मिरर नाऊ'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

सुशांतचा मृतदेह आणायला अ‍ॅम्ब्युलन्स गेली, पण...; चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Suicide case Mumbai Police puts hurdles in front of Bihar Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.