Join us

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नव्हे तर हत्या; माजी मुख्यमंत्र्यांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 16:55 IST

आता नारायण राणेंनी थेट सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली आहे असा आरोप केल्यानं राज्यात या प्रकरणावरुन वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. कोणालातरी वाचवण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. अद्यापही हत्येची एफआयआर दाखल झाली नाही असंही त्यांनी सांगितले आहे.

याबाबत नारायण राणे म्हणाले की, सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सरकार कोणाला तरी वाचवण्यासाठी चौकशीत टाळाटाळ करत आहे. मुंबई पोलिसांना सुशांतसोबत १३ तारखेच्या आणि ८ तारखेच्या पार्टीत कोण होतं हे माहिती नाही का? सगळ्या गोष्टी लपवल्या जात आहेत, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सरकार काम करत आहे. रियाला शोधून चौकशी करावी, दिनू मोर्याच्या घरी पार्टीला मंत्री काय करतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच पाऊस पडला म्हणून मंत्रालयाला सुट्टी दिली का? कोरोना बाधितांना बरं करुन घरी पाठवा. कोरोना मृतांची संख्या कमी करुन दाखवा, काम न करण्याचं सरकारचं धोरण आहे असा आरोपही नारायण राणेंनी राज्य सरकारवर केला आहे.

 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला बिहार पोलीस विरुद्ध मुंबई पोलीस असे वळण लागले असून, बिहारमधील सर्व राजकारणीही या प्रकारची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी करू लागले आहेत. बिहारमधील सर्व राजकारणी आणि पोलीसही मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी शंका उपस्थित करून लागले आहेत. बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने, यानिमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सर्व राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र ठाकरे सरकारने हा तपास सीबीआयकडे देण्याचा विरोध केला आहे. तसेच बिहारमधून चौकशीसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यालाही राज्य सरकारनं १४ दिवस क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे या प्रकरणावरुन भाजपाने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यातच आता नारायण राणेंनी थेट सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली आहे असा आरोप केल्यानं राज्यात या प्रकरणावरुन वातावरण पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतभाजपानारायण राणे