Sushant Singh Rajput Death Case Bihar police to probe disha salian suicide case | Sushant Singh Rajput Suicide: बिहार पोलीस 'त्या' आत्महत्येचीही चौकशी करणार; सुशांतसोबतचं कनेक्शन शोधणार

Sushant Singh Rajput Suicide: बिहार पोलीस 'त्या' आत्महत्येचीही चौकशी करणार; सुशांतसोबतचं कनेक्शन शोधणार

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांनी आता त्यांच्या तपासाचा मार्ग काहीसा बदलला आहे. बिहार पोलीस सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या आत्महत्येचीही चौकशी करणार आहेत. सुशांत आणि दिशाच्या आत्महत्येचं कनेक्शन तपासण्याचं काम बिहार पोलिसांनी हाती घेतलं आहे. बिहार पोलिसांनी दिशाचा शवविच्छेदन अहवाल मिळवला आहे. सुशांतनं आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वीच दिशानं आत्महत्या केली होती. 

सुशांत सिंह राजपूतचा शवविच्छेदन अहवाल मिळवण्यासाठी बिहार पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप तरी बिहार पोलिसांना अहवाल मिळालेला नाही. या प्रकरणी मुंबई पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत. त्यानंतर बिहार पोलिसांना शवविच्छेदन अहवाल द्यायचा की नाही, याचा निर्णय मुंबई पोलीस घेतील. मात्र बिहार पोलिसांनी सुशांतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनचा शवविच्छेदन अहवाल मिळवला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांनी दिशाच्या कुटुंबीयांचीदेखील चौकशी केली आहे. सुशांतनं आत्महत्या करण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी दिशानं मुंबईच्या मालाडमधील तिच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.

बिहार पोलीस सुशांत आणि दिशाच्या आत्महत्येमागचं कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र दिशाच्या आईनं दोघांच्या आत्महत्येचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिशानं सुशांतसोबत काम करणं बंद केलं होतं. त्यानंतर त्यांच्यात कोणताही संपर्क नव्हता, असं दिशाच्या आईनं एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितलं. दिशा तिच्या कामाबद्दल घरात फारसं कोणाशी बोलायची नाही, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पाटण्यात आत्महत्या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे. त्यात त्यांनी सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुशांत त्याची माजी मॅनेजर दिशाच्या आत्महत्येनंतर अत्यंत अस्वस्थ होता. रिया आपल्याला या प्रकरणात अडकवेल, अशी भीती सुशांतच्या मनात होती, असा दावा सुशांतच्या वडिलांनी केला आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sushant Singh Rajput Death Case Bihar police to probe disha salian suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.