Sushant Singh Rajput Case: ८० हजार बनावट सोशल अकाउंटवर गुन्हा; सायबर सेलची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:39 IST2020-10-07T06:09:28+5:302020-10-07T06:39:42+5:30
Sushant Singh Rajput Case: राज्यातील पोलिसांच्या बदनामीसाठी होता वापर

Sushant Singh Rajput Case: ८० हजार बनावट सोशल अकाउंटवर गुन्हा; सायबर सेलची कारवाई
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर तयार करण्यात आलेल्या ८० हजार बनावट अकाऊंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवरच्या अकाउंट्सचा समावेश आहे. लवकरच या कटामागील आरोपींवर कारवाई करणार असल्याचे सायबर पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले.
हायकोर्टात धाव
या बनावट अकाउंटवरून मुंबई पोलिसांची बदनामी, शिवीगाळ करण्यात येत होती. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तालयाच्या नावेही बनावट अकाउंट काढले होते.
काही वृत्तसंस्थांनीही चुकीच्या पद्धतीने तपास दाखवून पोलिसांची बदनामी केली. त्याविरुद्ध काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालय योग्य भूमिका घेईल, असे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.
सुशांतचे कुटुंबीय संशयाच्या भोवऱ्यात!
अभिनेता सुशांत ड्रग्ज घ्यायचा हे मुंबई पोलिसांच्याही तपासात समोर आले होते.
तसेच सुशांतच्या तणावाबाबत त्याची बहीणच तोतया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध देत असल्याचेही उघडकीस आले होते. त्यासंदर्भातील वर्ग केलेल्या गुन्ह्याचा सीबीआय योग्य तपास करेल, असा विश्वास पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी व्यक्त केला.