वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 05:57 IST2025-01-30T05:57:19+5:302025-01-30T05:57:42+5:30

लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाशी संलग्न अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Survey coming soon for water taxi service says pratap sarnaik | वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

वॉटर टॅक्सी सेवेसाठी लवकरच सर्वेक्षण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबई महानगर प्रदेशला (एमएमआर) मोठा सागरी किनारा लाभला असल्याने जलवाहतूक व्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी सांगितले. वॉटर टॅक्सी, पॉड टॅक्सी, रोप वे आणि अंडरग्राऊंड पार्किंग अशा नव्या व्यवस्थांची उभारणी करण्यासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन विभागाशी संलग्न अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

युरोपिय, आखाती आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये रस्ते वाहतुकीसोबत समांतर अशा जलवाहतुकीलाही प्राधान्य दिले जाते. मुंबई चारही बाजूंनी समुद्राने वेढली आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड, कल्याण, पनवेल, वसई-विरार, डहाणू आदी खाडीकिनारेही आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी जलवाहतुकीला चालना देता येणे शक्य असल्याने आजच्या बैठकीत प्रामुख्याने या विषयावर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश दिल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 

एमएमआरडीए करणार प्रकल्पाची उभारणी 
मेरीटाईम बोर्ड जलवाहतुकीचा आराखडा तयार करून शासनाला सादर करणार आहे. प्रकल्पाची उभारणी एमएमआरडीए करेल आणि त्याचे संचालन परिवहन विभागामार्फत केले जाईल, असे  सरनाईक यांनी सांगितले. 

पॉड टॅक्सी, रोप वे सर्वेक्षण  
वांद्रे ते कुर्ला दरम्यान पॉड टॅक्सीसाठीचे सर्वेक्षण येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. रोप वे साठी समुद्र, खाडी, महामार्ग, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर असे पर्याय उपलब्ध आहेत, असे सरनाईक म्हणाले.

वाॅटर काॅर्पोरेशन स्थापणार
जलवाहतूक सुरू करणे जटील काम आहे. त्यात समुद्री गाळ, सुरक्षितता, समुद्राची स्वच्छता अशा गोष्टी आहेत. त्यामुळे रेल काॅर्पोरेशनप्रमाणे वाॅटर काॅर्पोरेशनही स्थापन करण्याचा विचार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.  

Web Title: Survey coming soon for water taxi service says pratap sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.