मुंबई : पाणीपट्टी वेळेत न भरणाऱ्या मुंबईकरांना आता अधिक आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. थकीत पाणीपट्टीवर १० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यंत अधिभार आकारण्याचा महापालिकेने घेतला आहे. एप्रिलच्या पाणीपट्टीपासून त्याची अंमलबजावणी होणार असून, ऑगस्टपासून प्रत्यक्ष बिल आकारले जाईल, अशी माहिती पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
पालिकेकडून दर तीन महिन्यांनी पाणीपट्टीचे बिल पाठविले जाते. हे बिल एक महिन्याच्या आत भरणे बंधनकारक आहे. आतापर्यंत मुदतीत बिल न भरल्यास थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. मात्र, आता ही पद्धत रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी निश्चित रकमेचा अधिभार आकारला जाणार आहे.
मुंबईत पाणीपट्टीमध्ये शेवटची वाढ २०२१ मध्ये झाली होती. तेव्हा पालिकेने ५.२९ टक्के इतकी वाढ केली होती. त्यानंतर पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव होता. पण अंमलबजावणी झाली नाही.
अधिभाराची रचना अशीबिलाची रक्कम मासिक अधिभार१,००० पर्यंत १० रुपये१,००० ते १०,००० ५० रुपये१०,००० पेक्षा जास्त कमाल ५,००० रुपये
अधिभार का ? पालिका सात धरणांतून मुंबईला दररोज ४,००० एमएलडी पाणीपुरवठा करते. हा पुरवठा गृहनिर्माण सोसायटी, झोपडपट्टी व औद्योगिक परिसरांना वेगवेगळ्या दराने केला जातो. मात्र, पाणीपट्टी वेळत भरण्याचे प्रमाण कमी असल्याने पालिकेच्या महसुलात घट होते.२०२० पासूनची थकीत शुल्कावर सवलत देणारी ‘अभय योजना’ मार्च २०२५ मध्ये संपुष्टात आली. नव्या अधिभार पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ही पद्धत टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे.