Join us

'बॉस इज ऑलवेज राईट...' सुप्रिया सुळेंकडून मोदींच्या मोठेपणाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 14:39 IST

महाराष्ट्रातील राजकारणात आमचे वैयक्तीक संबंध अतिशय चांगले असतात. भलेही आमच्या विचारात काही प्रमाणात अंतर

मुंबई - आमची सर्वात मोठी लढाई भाजपाविरुद्धच होती. निवडणूक काळातही दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपासोबत जाण्याचा प्रश्न नव्हता, असे म्हणत भाजपाला पाठिंबा देण्यास आम्ही तयार नसल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी जर शिवसेनेसोबत जाऊ शकते, तर भाजपासोबत का नाही? असा प्रश्न सुप्रिया यांना विचारण्यात आला होता. त्यावर, स्पष्टीकरण देताना, सुप्रिया सुळेंनी एका खासगी हिदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचं विश्लेषणही केलं. 

महाराष्ट्रातील राजकारणात आमचे वैयक्तीक संबंध अतिशय चांगले असतात. भलेही आमच्या विचारात काही प्रमाणात अंतर असेल, पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले राहिले आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवारसाहेब माझे केवळ वडिल नाहीत, तर माझे बॉसही आहेत. नोकरी टिकवायची असेल तर, बॉस इज ऑलवेज राईट... असे म्हणत शरद पवारांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. 

शरद पवार देशाचे कृषीमंत्री होते, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र, शरद पवारांनी कधीही दुजाभाव केला नाही, जेवढं महाराष्ट्राला दिलं तेवढंच गुजरातलाही, इतरही राज्यांना दिलं. त्यामुळे विकासाच्या कामासाठी शरद पवार कधीही मागे नसतात. विकासकामाला आमचा भाजपाला पाठिंबा राहिलच, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं. मोदींनी दिलेल्या ऑफरसंदर्भात बोलताना, मी बैठकीला नव्हते म्हणून यावर मी बोलणं उचित नाही. पण, मोदींनी ऑफर दिली असेल तर तो मोदींचा मोठेपणाच होता. मात्र, तरीही शरद पवारांना विनम्रतेनं ती ऑफर नाकारली, हेही त्यांचा आदरभाव होता, असे म्हणत पवार-मोदी भेटीवरील चर्चेवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केलंय. दरम्यान, शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींकडून सुप्रिया यांना मंत्रीपदाची तर पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर होती, याबाबत चर्चा केली होती.   

टॅग्स :सुप्रिया सुळेशरद पवारनरेंद्र मोदीशिवसेना