सप्टेंबर महिना जागतिक स्तरावर 'बालकॅन्सर जागरूकता महिना' अर्थात चाइल्डहूड कॅन्सर अवेअरनेस माहिना म्हणून ओळखला जातो. याच निमित्ताने 'सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्स' संस्थेने उचलेले पाऊल कर्करोगाशी लढणाऱ्यांसाठी आधार ठरत आहे. भारतात दरवर्षी ५० ते ७५ हजार बालकॅन्सरचे नवीन रुग्ण आढळतात. यापैकी अनेक मुले ग्रामीण भागातून उपचारासाठी मुंबई, दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. त्यांच्या पालकांसमोर मुलाच्या आजारासोबतच राहण्याचा आणि उपचारांचा खर्च, ही मोठी आव्हाने उभी राहतात. अनेकदा त्यांना रुग्णालयाच्या बाहेर किंवा फुटपाथवर राहावे लागते, ज्यामुळे मुलांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि उपचारांमध्ये अडथळे येतात.
‘सेंट जूड इंडिया’ची अनोखी मदत२००६ साली श्यामा आणि निहाल कवीरत्रणे यांनी 'सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्स'ची स्थापना केली. कॅन्सरग्रस्त मुलांच्या उपचारादरम्यान त्यांच्या कुटुंबाला मोफत आणि सुरक्षित निवारा देणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. टाटा मेमोरियल आणि एम्ससारख्या मोठ्या रुग्णालयांच्या जवळच त्यांची केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये केवळ राहण्याची सोयच नाही, तर पौष्टिक आहार, समुपदेशन आणि मुलांना शिक्षणाचाही आधार दिला जातो.
यामुळे उपचारादरम्यान येणारा मानसिक आणि आर्थिक ताण कमी होतो. टाटा मेमोरियलच्या आकडेवारीनुसार, ‘सेंट जूड्स’च्या मदतीमुळे उपचार सोडून देणाऱ्या मुलांचे प्रमाण ३०% वरून ५% पेक्षा कमी झाले आहे.
मिळणाऱ्या सुविधा आणि प्रभाव'सेंट जूड्स'ची केंद्रे म्हणजे खऱ्या अर्थाने या रुग्णांसाठी दुसरे घर आहे. येथे कुटुंबाला वेगळी खोली, पलंग, आणि गरजेच्या वस्तू मिळतात. मातांसाठी स्वयंपाकघर आणि आठवड्याचा किराणा पुरवला जातो. स्वच्छ स्नानगृहे आणि कपडे धुण्याची सोय आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांसाठी येथे स्वच्छतेचे विशेष नियम पाळले जातात.
याशिवाय, मुलांसाठी खेळ आणि शिकण्याचे वर्ग घेतले जातात. यामुळे त्यांचा उपचारातील प्रवास सुसह्य होतो आणि त्यांना शारीरिक तसेच मानसिक आधार मिळतो.
प्रवासाची यशोगाथागेल्या १९ वर्षांत ‘सेंट जूड इंडिया’ने ८०००हून अधिक मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत केली आहे. आज मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा ११ शहरांमध्ये त्यांची ४९ केंद्रे कार्यरत आहेत. लवकरच नवी मुंबईतील खारघर येथे त्यांचे सर्वात मोठे केंद्र सुरू होणार आहे. येथे एकाच वेळी २३४ कुटुंबांना राहता येईल, ज्यामुळे पुढील २० वर्षांत ३४०००हून अधिक कुटुंबांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
सेंट जूड्स फॉर लाईफ - भविष्यासाठीचा आधार२०२०मध्ये सुरू झालेला 'सेंट जूड्स फॉर लाईफ' हा कार्यक्रम कॅन्सरवर मात केलेल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतो. या कार्यक्रमांतर्गत त्यांना शैक्षणिक मदत, लॅपटॉप, आणि करिअर मार्गदर्शन दिले जाते. आतापर्यंत १०००हून अधिक कॅन्सर-मुक्ती मिळालेल्या मुलांनी याचा लाभ घेतला आहे. अलीकडेच झालेल्या नोकरी मेळाव्यात त्यांना अनेक चांगल्या संधी मिळाल्या.
तुम्ही कसे सहभागी होऊ शकता?तुम्हीही या कार्यात सहभागी होऊ शकता. 'सेंट जूड इंडिया'ला मदत करण्यासाठी अनेक मार्ग आहेत.
केंद्रांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी, त्यांच्यासोबत खेळण्यासाठी किंवा इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही स्वयंसेवक म्हणून नोंदणी करू शकता. यासाठी volunteerwithus@stjudechild.org येथे मेल करा. यासोबतच तुम्ही http://www.stjudechild.org/ यावर नोंदणी करू शकता.
https://stjudechild.org/donate/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आर्थिक मदत करू शकता. तुमच्या प्रत्येक देणगीचा उपयोग निवास, जेवण, शिक्षण, आणि समुपदेशनासाठी केला जातो. या सर्व देणग्यांवर आयकर कायद्यानुसार करसवलत मिळते.