हवालाद्वारे नशेच्या सिरपचा पुरवठा; मालवणी पोलिसांकडून ७१० बाटल्या जप्त; २ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 09:24 IST2025-07-02T09:23:32+5:302025-07-02T09:24:20+5:30
नशेसाठी वापरला जात असल्याने बंदी घालण्यात आलेल्या मेडिकल सिरपचा मोठा साठा मालवणी पोलिसांनी जप्त केला आहे.

हवालाद्वारे नशेच्या सिरपचा पुरवठा; मालवणी पोलिसांकडून ७१० बाटल्या जप्त; २ अटकेत
मुंबई : नशेसाठी वापरला जात असल्याने बंदी घालण्यात आलेल्या मेडिकल सिरपचा मोठा साठा मालवणी पोलिसांनी जप्त केला आहे. हे अमली पदार्थ हवाला माध्यमाने शहरात दाखल झाल्याची शंका तपास अधिकाऱ्यांना आहे. याप्रकरणी दोघांचा गाशा गुंडाळत त्यांच्याकडून ७१० बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत लाखोंच्या घरात आहे.
रिजवान अन्सारी (२९) आणि नावेद बटाटावाला (२७), अशी या दोन आरोपींची नावे असून, ते अनुक्रमे धारावी आणि डोंगरी परिसरातील रहिवासी आहेत. १ जुलै रोजी मालवणी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे यांचे निगराणी पथक गस्त घालत असताना दोन संशयितांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील दोन सफेद रंगाच्या गोणीमध्ये कोडेन फॉस्पेट हा अमली पदार्थमिश्रित कफ सिरपचा साठा सापडला. हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांनी आणल्याचे पोलिस पथकाला सांगितले.
तांत्रिक बाबींची पूर्तता करून कारवाई
परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त आनंद भोईटे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हिंडे, सहायक पोलिस निरीक्षक शिळमकर, हवालदार पाटील, घोसाळकर, शिपाई पाटील, वळतकर, देसाई, खुडे या पथकाने सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून दोघांना अटक केली.
३.५५ लाख रुपयांचा साठा जप्त
हस्तगत केलेल्या साठ्यातील प्रत्येक बाटलीची किंमत ५०० रुपये असून, त्याची बाजारातील एकूण किंमत ३.५५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींनी हवाला माध्यमाने हे अमली पदार्थ शहरात आणल्याचा संशय पोलिसांना असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्यांच्या सोबत आणखी साथीदारांचा समावेश असल्यास त्यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.