मुंबई पालिकेचा रणसंग्राम! शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस; ११ हजार अर्जांची विक्री, पण रिंगणात २,५१६ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:10 IST2025-12-31T14:09:15+5:302025-12-31T14:10:21+5:30
मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अर्जांचा महापूर पाहायला मिळाला.

मुंबई पालिकेचा रणसंग्राम! शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस; ११ हजार अर्जांची विक्री, पण रिंगणात २,५१६ उमेदवार
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० डिसेंबर रोजी मुंबईतील निवडणूक कार्यालयांमध्ये अक्षरशः जत्रा भरली होती. एकूण दाखल झालेल्या अर्जांपैकी तब्बल ८४ टक्के अर्ज केवळ शेवटच्या दिवशी दाखल झाल्याने निवडणूक यंत्रणेची मोठी दमछाक झाली.
आकडेवारी काय सांगते?
निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार एकूण ११,३९१ अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात २,५१६ अर्ज दाखल करण्यात आले. २,१२२ उमेदवारांनी म्हणजेच ८४ टक्के उमेदवारांनी ३० डिसेंबर रोजी आपले अर्ज सादर केले. सुरुवातीच्या दिवसांत शांतता असलेल्या निवडणूक कार्यालयांमध्ये शेवटच्या २४ तासांत राजकीय पक्षांच्या शक्तीप्रदर्शनामुळे प्रचंड गर्दी झाली होती. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांनी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे.
बंडखोरीचे मोठे आव्हान
शेवटच्या दिवशी ८४ टक्के अर्ज दाखल होण्यामागे बंडखोरी हे सर्वात मोठे कारण आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष किंवा इतर पक्षांकडून डमी अर्ज भरले आहेत. आता ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत किती जण माघार घेतात, यावर निवडणुकीचे खरे गणित अवलंबून असेल.
पुढील टप्पा काय?
आगामी दोन दिवसांत उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप १३७ तर शिवसेना ९० जागा लढवणार आहे. मनसेकडून ५३ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून यामध्ये महिला उमेदवारांना मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सुमारे ११३ उमेदवारांना संधी दिली आहे.