सुनील केदार यांची आमदारकीही रद्द; विधिमंडळ सचिवालयाकडून अधिसूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:00 AM2023-12-25T06:00:37+5:302023-12-25T06:00:59+5:30

काँग्रेसला हा विदर्भात मोठा धक्का मानला जात आहे.  

sunil kedar mla disqualification and notification from legislature secretariat | सुनील केदार यांची आमदारकीही रद्द; विधिमंडळ सचिवालयाकडून अधिसूचना 

सुनील केदार यांची आमदारकीही रद्द; विधिमंडळ सचिवालयाकडून अधिसूचना 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आपली आमदारकी गमवावी लागली आहे. काँग्रेसला हा विदर्भात मोठा धक्का मानला जात आहे.  

नागपूर विशेष न्यायालयाने शुक्रवारी जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी केदार यांना शिक्षा सुनावल्यांतर दुसऱ्याच दिवशी केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना  विधिमंडळ सचिवालयाने प्रसिद्ध केली. केदार यांना शिक्षा सुनावण्यात आल्याच्या २२ डिसेंबर २०२३ या दिवसापासूनच आमदारकी रद्द करण्याबरोबरच त्यांचा सावनेर विधानसभा मतदारसंघही रिक्त झाल्याचेही जाहीर करण्यात आले.  

नागपूरला २८ डिसेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या महारॅलीचे आयोजन केले असतानाच केदार यांना झालेली शिक्षा व त्यांची रद्द झालेली आमदारकी असा दुहेरी फटका काँग्रेसला बसला आहे. 

एमआरआय नॉर्मल, क्रिएटिनिन वाढले  

नागपूर : मेडिकलच्या आयसीयूमध्ये भरती असलेले माजी मंत्री सुनील केदार यांचा एमआरआयचा अहवाल रविवारी नॉर्मल आला. परंतु, क्रिएटिनिन वाढल्याने ‘सीटी ॲन्जिओग्राफी’ पुढे ढकलण्यात आली. या तपासणीचा अहवाल ‘नॉर्मल’ आल्यावरच त्यांची मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता आहे.

जेव्हा लोकप्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा जास्तीची शिक्षा होते तेव्हा आमदारकी नियमानुसारच रद्द होते. मात्र, जर त्या दोषसिद्धीला स्थगिती मिळाली तरच दिलासा मिळू शकतो अन्यथा नाही. त्यामुळे नियमानुसारच कार्यवाही होईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

रविवार असतानाही सदस्यत्व रद्द करण्याची घाई का? भाजपचे गुजरातमधील खासदार नारणभाई काछडीया यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. तरी त्यांची खासदारकी लगेच रद्द करण्यात आली नव्हती.  - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

 

Web Title: sunil kedar mla disqualification and notification from legislature secretariat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.