उष्णता वाढताच विषारी साप बाहेर; बचावासाठी काय काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:48 IST2026-03-31T11:47:31+5:302026-03-31T11:48:22+5:30
नाग, धामण यांना मारू नका, प्राणिमित्रांची मदत घ्या; सामाजिक संस्थांचे नागरिकांना आवाहन

उष्णता वाढताच विषारी साप बाहेर; बचावासाठी काय काळजी घ्याल?
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात उन्हाळा वाढत असून, महामुंबई परिसरातही हीच अवस्था आहे. अशावेळी दाटीवाटीची वस्ती, आरे कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासह बंद गिरण्या आणि बाकी परिसरात सरपटणारे प्राणी लोकवस्तीमध्ये शिरकाव करत आहेत. अशावेळी त्या प्राण्याच्या जीवासह मनुष्याच्या जीवालाही धोका आहे. अशावेळी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
साप आणि तत्सम प्राणी आढळल्यास नेमके काय करावे? वन विभागाची आणि प्राणिमित्रांची कशी मदत घ्यावी, याबाबत प्राणीमित्र संस्थांनी माहिती देत साप, नाग, धामण यांना मारू नये, असे आवाहन केले आहे. तापमान वाढत असून, त्याचा परिणाम मानवांवरच नव्हे, तर प्राणी, पक्षी आणि साप, सरडे आणि कासव यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांवरही होत आहे. उन्हामुळे प्राण्यांना निर्जलीकरण, उष्णतेचा ताण आणि अधिवास बिघाडाचा सामना करत ते थंड व सुरक्षित ठिकाणांच्या शोधात त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडत आहेत.
बचावासाठी प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना बोलावू नका. सरपटणारे प्राणी धोका वाटल्याशिवाय हल्ला करत नाहीत.
काठी किंवा इतर वस्तूंनी सरपटणाऱ्या प्राण्यांना पकडण्याचा किंवा चिथावणी देण्याचा प्रयत्न करू नका. हे प्राणी फर्निचरखाली, पाण्याच्या टाक्यांजवळ किंवा साठवलेल्या वस्तूंच्या खाली अशा थंड, सावलीच्या किंवा ओलसर ठिकाणी आश्रय घेतात.
घराच्या आत व आसपास असलेल्या भेगा आणि छिद्रे विशेषतः स्वयंपाकघर व बाथरूममध्ये बंद करा.
मुंबईत सामान्यतः आढळणारे साप
विषारी : मण्यार, घोणस, फुरसे, नाग/कोब्रा, मांजऱ्या सर्प, हरणटोळ, चापडा.
बिनविषारी : अजगर, धामण, मांडूळ, डुरक्या घोणस, तस्कर, धुळ नागीण, गवत्या, नानेटी, कवड्या, पाण दिवड.
'सरपटणाऱ्या वन्यजीवांना इजा करू नका'
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल प्रोटेक्शन, अम्मा केअर फाउंडेशन आणि प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर सोसायटी, मुंबई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आढळणाऱ्या कोणत्याही सरपटणाऱ्या प्राण्यांना किंवा वन्यजीवांना इजा करू नये. घाबरू नये किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये.
सरपटणारे प्राणी पर्यावरणीय समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना त्रास देणे किंवा मारणे हे पर्यावरणासाठी हानिकारक असून, कायद्याने दंडनीय गुन्हा आहे- सुनिष सुब्रमण्यन, मानद वन्यजीव रक्षक, वन विभाग