'अब तक ५६' सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 21:37 IST2018-07-11T20:57:34+5:302018-07-11T21:37:53+5:30
वर्सोवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद

'अब तक ५६' सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरने केली आत्महत्या
मुंबई - 'अब तक ५६' या पोलीस अधिकारी दया नायकावर आधारित आलेल्या सिनेमाच्या स्क्रिप्ट रायटरने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अंधेरी पश्चिम येथील सात बंगला परिसरातील वसंत सोसायटीच्या इमारतीवरू ३२ वर्षीय रविशंकर आलोकने आत्महत्या केली आहे. हि घटना आज दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत सोसायटी हि ७ मजली इमारत असून या इमारतीच्या टेरेसवरून रविशंकर यांनी आत्महत्या केली. भावासह रविशंकर भाड्याच्या घरात राहत होते. भावाला घडलेला प्रकार इमारतीच्या वॉचमनने सांगितला. तसेच भावाने रविशंकर हे गेले अनेक दिवस तणावाखाली होते असून त्यांच्यावर डॉ. पाटकर हे उपचार करत होते. त्यामुळे प्राथमिक अंदाज हा तणावातूनच आत्महत्या केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला होता.