लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भाजपचे सात टर्मचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. पण, सुधीरभाऊंचा फॉर्म काही कमी नाही झालेला. मंत्र्यांना बोलण्याबाबत मर्यादा असतात. सुधीरभाऊ आता केवळ आमदार आहेत. पण, जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्याची संधी ते वारंवार घेत राहतील, असे संकेत त्यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. प्रश्न कृषी विभागाशी संबंधित होता. मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल उत्तरे देत होते.
मंत्रालयाचे आधीचे नाव सचिवालय होते, ते बदलून मंत्रालय केले. तरीही सचिव लिहून देतात तशीच्या तशी उत्तरे देऊ नका, असे सुधीरभाऊंनी फटकारले. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादकांना नुकसान भरपाई का दिली जात नाही, मंत्रालयात शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कोण वाल्मीक कराड हे ते शोधा, असा टोला त्यांनी हाणला. सुधीरभाऊ सरकारला कानपिचक्या देताना आक्रमक झाले. तेव्हा नुकसान भरपाई देणारच अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर बुधवारी सभागृहात बोलतानाही सुधीरभाऊंनी चिमटे काढले होतेच, भाऊंचा हा नवा अवतार तर नाही?