डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी; चार तासांची बचत शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 12:15 IST2026-04-02T12:14:44+5:302026-04-02T12:15:27+5:30

दादरी-मुंबई मालवाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा

successful trial of container train on dedicated freight corridor four hours of savings possible | डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी; चार तासांची बचत शक्य

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी; चार तासांची बचत शक्य

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवर (डब्ल्यूडीएफसी) जेएनपीटी-न्यू सफाळे विभागात पहिल्या भरलेल्या कंटेनर ट्रेनची सोमवारी यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता दादरी ते मुंबईतील जेएनपीटीदरम्यान अखंड मालवाहतूक रेल्वेसेवेचा मार्ग खुला झाला आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून (डीएफसीसीआयएल) उभारण्यात येत असलेला 'पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग' देशाच्या अंतर्गत भागांतील मालवाहतूक आणि जेएनपीटी बंदर यांमधील वाहतूक अधिक वेगवान करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. १,५०६ किमी लांबीचा हा दुहेरी रेल्वेमार्ग केवळ मालवाहतुकीसाठी विकसित केला जात आहे.

सोमवारी दुपारी १:५८ वाजता इंजिन जेएनपीटीतील नव्या डीएफसी यार्डातून रवाना झाले. हे इंजिन सायंकाळी ७:२० वाजता न्यू सफाळे स्थानकात दाखल झाले. १०६ किमी अंतर ५ तास २२ मिनिटांत पूर्ण करण्यात आले. या चाचणीत नव्या रुळांची क्षमता तपासण्यासाठी दोन्ही दिशांनी कंटेनर जोडलेल्या मालगाड्या चालवण्यात आल्या.

जेएनपीटी ते न्यू सफाळेदरम्यान इलेक्ट्रिक इंजिन, तर न्यू सफाळे ते जेएनपीटीदरम्यान डिझेल इंजिनच्या साहाय्याने मालगाड्या चालविण्यात आल्या. एकाच वेळी दोन्ही दिशांनी गाड्या चालवून संपूर्ण विभागाची तपासणी करण्यात आली. 

'डीएफसीसीआयएल'चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही चाचणी पार पडली. संचालन, पायाभूत सुविधा, विद्युत, सिग्नलिंग आणि प्रकल्प विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

चार तासांची बचत शक्य

'डब्ल्यूडीएफसी'च्या जेएनपीटी जोडणीमुळे मालवाहतुकीच्या प्रवास वेळेत सुमारे चार तासांची बचत होणार आहे. न्यू मकरपुरा ते जेएनपीटीदरम्यान कमी मनुष्यबळात अधिक कार्यक्षमतेने वाहतूक करणे शक्य होईल. हा कॉरिडॉर पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर मालगाड्यांच्या वेळापत्रकातील अडथळे कमी होऊन वक्तशीरपणा वाढेल. देशातील प्रमुख बंदराला थेट आणि विनाअडथळा रेल्वे जोडणी मिळाल्याने मालवाहतूक अधिक वेगवान होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर पर कंटेनर ट्रेन का सफल परीक्षण; चार घंटे की बचत

Web Summary : पश्चिमी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर के जेएनपीटी-न्यू सफाले खंड पर कंटेनर ट्रेन का सफल परीक्षण। जेएनपीटी और आंतरिक क्षेत्रों के बीच तेज माल परिवहन का मार्ग प्रशस्त, संभावित रूप से चार घंटे की बचत। 1,506 किमी मार्ग का लक्ष्य दक्षता को बढ़ावा देना है।

Web Title : Container Train Trial Successful on Dedicated Freight Corridor; Saves Four Hours

Web Summary : A successful trial run of a container train on the Western Dedicated Freight Corridor's JNPT-New Safale section paves the way for faster freight transport between JNPT and inland areas, potentially saving four hours. The 1,506 km route aims to boost efficiency.