Successful first hand transplant surgery, the beginning of Monica's new life | पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात

पश्चिम भारतात पहिल्यांदा दोन हातांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी, मोनिकाच्या नव्या आयुष्याला सुरुवात

मुंबई - कुर्ला येथे राहणा-या २४ वर्षीय मोनिका मोरे हिला आज ४ आठवड्यांनंतर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे. तिच्यावर दोन्ही हातांवर २८ ऑगस्ट रोजी तब्बल १६ तास प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  शस्त्रक्रियेनंतर तिच्या प्रकृतीत खूप चांगली सुधारणा झाली असून, ती पुढील नवीन आयुष्यासह सहा वर्षांनंतर पुन्हा स्वावलंबी जीवन जगणार आहे. २०१४मध्ये घाटकोपर येथील रेल्वे अपघातात मोनिकाने तिचे दोन्ही हात गमावले होते. तिने कृत्रिम हातांच्या सहाय्याने आपले दैनंदिन आयुष्य जगण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून सुरू केला होता, परंतु तिला ते हात निरुपयोगी असल्याचे जाणवू लागले.

दोन वर्षांपूर्वी तिने मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दोन्ही हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली. पण गेल्या काही दिवसांपासून मोनिकाला अवयव दात्यांकडून हात उपलब्ध होऊ शकले नव्हते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून हात दान करण्यासाठी कोणी तयार होत नसल्याने ही शस्त्रक्रिया रखडली होती. परंतु चेन्नईतील ३२ वर्षीय मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मोनिकाला नवीन हात मिळाले आहेत. चॉर्टड विमानाने हे हात मुंबईत आणण्यात आले होते. रात्री उशिरा या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. साधारणतः १६ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. आता ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, मोनिकाला आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई म्हणाले की, ‘‘हात मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून मोनिकाच्या दोन्ही हातांचे प्रत्यारोपण रखडले होते. पण आता हात मिळाल्याने तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. हातांचे प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला प्रत्यारोपण अतिदक्षता विभागात एका वेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आले होते. तसेच तिची काळजी घेण्यासाठी विलगीकरणासह एका नर्सची नियुक्ती देखरेखीसाठी करण्याची आवश्यकता होती. दोन्ही हातांना नियमित मलमपट्टी करण्यात आली. रुग्ण प्रत्यारोपणाच्या तिस-या दिवशी ती आपल्या खांद्याचा आधार घेऊन चालू व बसू लागली. याशिवाय दिवसातून दोनदा तिला फिजिओथेरपी दिली जात होती. हातांच्या हाडांना आधार मिळावा, यासाठी हाताच्या कोपऱ्यापर्यंत प्लास्टर करण्यात आला आहे.”
डॉ.सातभाई पुढे म्हणाले, “येत्या काही आठवड्यांत तिला कोपर हलवायला सांगितले जाईल.

याशिवाय हात आणि बोटांनी ३-४ महिन्यांनंतर हालचाल सुरू होणे अपेक्षित आहे. तिच्या हाताचे स्नायूतील टिश्य आणि हाड तोपर्यंत बरे होतील. रूग्णाला या काळात आपल्या दैनंदिन कार्य़ासाठी मदत घ्यावी लागेल. पण, एकदा तिच्या हातांची हालचाल आणि व्यायाम व फिजिओथेरपीव्दारे ती लवकरच अधिक अधिक स्वावलंबी होईल. तिच्या हातांच्या रिकव्हरीसाठी साधारण एक ते दीड वर्ष लागेल. हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला आता चार आठवडे पूर्ण झाले असून मोनिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून तिच्या फक्त गोळ्या सुरू आहेत. रुग्ण खूप चांगल्या प्रकारे पूर्ववत होत असून उपचारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे.  हे लक्षात घेऊन मोनिकाला आता घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, घरी गेल्यावरील तिला दररोज व्यायाम व फिजिथेरपी घेणं गरजेचं आहे.”

मोनिका मोरे म्हणाली, “मला नवीन हात मिळतील, असा माझा ठाम विश्वास होता. आता माझं स्वप्न पूर्ण झाल्याने मी खूप आनंदी आहे. हात गमावल्याने कोणाच्याही लग्नात मला हाताला मेहंदी लावता येत नव्हती. पण आता मी पुन्हा मेहंदी लावू शकेन. याशिवाय, चित्र काढणे, आंघोळ करणे, स्वयंपाक आणि केस बांधणे ही काम मी स्वतः करु शकेन, याचा मला आनंद आहे. मला मिळालेल्या या नवीन आयुष्यासाठी माझे कुटुंबीय, अवयवदाता आणि डॉक्टरांचे मी आभार मानते. ”
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Successful first hand transplant surgery, the beginning of Monica's new life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.