योग्य नियोजनानेच मिळणार सीईटीच्या परीक्षेत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:02 IST2019-03-06T00:02:43+5:302019-03-06T00:02:50+5:30
एमबीए करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’ व कोहिनूर बिझनेस स्कूलच्या वतीने वाशी सेक्टर ९ ए येथील दैवज्ञ भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

योग्य नियोजनानेच मिळणार सीईटीच्या परीक्षेत यश
मुंबई : एमबीए करू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’ व कोहिनूर बिझनेस स्कूलच्या वतीने वाशी सेक्टर ९ ए येथील दैवज्ञ भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वेळेचे अचूक नियोजन, अभ्यासाचे गणित, सरावातून सीईटीची परीक्षा किती सोपी होऊ शकते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेंतर्गत सीईटीमध्ये कोणते प्रश्न सोडवावेत, कोणते सोडवू नयेत हे पाहणे महत्त्वाचे असते आणि याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
वेळेचे अचूक नियोजन केल्यास प्रत्येक प्रश्नासाठी पुरेसा वेळ देता येतो. कारण परीक्षेला २०० प्रश्न असून या प्रश्नांना १५० मिनिटांचा वेळ असतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला १४ सेकंदांचा कालावधी असतो. त्यामुळे वेळेचे गणित अचूकपणे मांडून प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळ दिल्यास सीईटीच्या परीक्षेत यश नक्कीच मिळेल, अशी खात्री कोहिनूरचे वरिष्ठ व्यवस्थापक विष्णू चौरे यांनी व्यक्त केली़ या कार्यशाळेला विवेक सारडा, डॉ. हेमंत ठक्कर, स्नेहल खेडकर, नजराना शेख आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते. कोहिनूरचे प्रोग्रॅम हेड प्रा. संदीप सावंत यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एमबीए कोर्स आपण का करत आहोत, कोणते इन्स्टिट्यूट निवडावे , ते निवडताना तेथील शिक्षक कसे आहेत, त्यांचे इंडस्ट्रीबरोबरचे संबंध कसे आहेत, कोणत्या प्रकारचे कोर्सेस घेतले जातात, नवीन तंत्र अवलंबण्याची संधी उपलब्ध होते का? याची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला होता.
शहर आणि उपनगरातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने दादर, ठाणे, बोरीवली आणि वाशी अशा चार ठिकाणी कार्यशाळेचे वर्ग घेण्यात आले. या कार्यशाळेंतर्गत विद्यार्थ्यांना एमएच सीईटीसाठी पूर्वतयारी आणि गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
>तज्ज्ञांचे मार्गदर्शन
शैक्षणिक कर्जाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या शंका, बिझनेस स्कूलची निवड कशी करावी, प्लेसमेंटची संधी कशी मिळवावी तसेच एमबीए प्रवेशाकरिता कोहिनूरचे वरिष्ठ व्यवस्थापक विष्णू चौरे यांनी यांनी विशेष मार्गदर्शन केले. परीक्षेत यश कसे मिळवावे, अधिकाधिक गुण संपादन कसे करावे, लेखी परीक्षेत गुणांची टक्केवारी कशी वाढवावी यावर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.