दक्षिण मुंबईतून बीकेसीपर्यंत भुयारी मार्ग? वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न; एमएमआरडीए लवकरच सल्लागार नेमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 09:51 IST2025-09-29T09:50:25+5:302025-09-29T09:51:15+5:30
दक्षिण मुंबई थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) आहे.

दक्षिण मुंबईतून बीकेसीपर्यंत भुयारी मार्ग? वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न; एमएमआरडीए लवकरच सल्लागार नेमणार
अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबई थेट बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) आहे. त्यासाठी वरळी येथून मार्ग उभारण्यात येणार आहे. त्याच जोडीला मुंबईतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी भुयारी मार्गांचे जाळे विणण्याचेही विचाराधीन असून त्याचा अभ्यास करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे.
मुंबई शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच जागेच्या कमतरतेमुळे रस्ते रुंदीकरणावर मर्यादा असून उन्नत मार्ग उभारतानाही पुनर्वसनाचे प्रश्न उभे राहतात. या पार्श्वभूमीवर आता थेट भुयारी मार्गांच्या जाळ्याने मुंबई जोडण्याचा विचार असून दक्षिण मुंबईपासून थेट बोरीवली आणि पूर्व उपनगरांपर्यंत हे जाळे विस्तारले जाणार आहे. त्यातून मुंबईत एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत थेट भुयारी मार्गातून प्रवास करणे शक्य होणार आहे.
दरम्यान बुलेट ट्रेन स्थानक सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून बीकेसीपर्यंत जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सध्याचा मार्ग अपुरा पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत जलद प्रवासासाठी पहिल्या टप्प्यात वरळी येथे कोस्टल रोडचा शेवट तेथून पुढे बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा मानस आहे, तर पुढील टप्प्यात बीकेसी येथून पूर्व आणि पश्चिम उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
असे असेल मार्गाचे जाळे
कोस्टल रोड वरळी येथे संपतो. तेथून ते बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत भुयारी मार्ग उभारणी, तसेच त्याचा पुढे आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत विस्तार करण्याचा मानस आहे, तसेच हा भुयारी मार्ग पुढे थेट ठाणे, बोरीवली भुयारी मार्गापर्यंत नेता येऊ शकतो का, याचाही विचार केला जात आहे. त्याचबरोबर बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकापासून एमटीएचएल आणि पूर्व उपनगरात जाण्यासाठी भुयारी मार्ग उभारता येईल का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.
मुंबईत सध्या महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात भुयारी मार्ग आहे, तसेच एमएमआरडीए घोडबंदर रस्त्यावर फाउंटन हॉटेल ते गायमुख असा भुयारी मार्ग उभारणार आहे.
या मार्गांची कामे सुरू
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग -
लांबी : ११.८५ किमी
प्रकल्प खर्च : १८,८३८ कोटी रुपये
ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह भुयारी मार्ग
लांबी : ९.२३ किमी
प्रकल्प खर्च : ९,१५८ कोटी रुपये.
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता भुयारी मार्ग - १२.२० किमी लांबी