Join us

जे जे रुग्णालय परिसरात सापडले भुयार; १३० वर्षे जुने, २०० मीटर लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 11:33 IST

सर जे जे रुग्णालय १८४५ साली रुग्णांसाठी खुले करण्यात आले. त्याचदरम्यान वैद्यकीय शिक्षणासाठी ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजही सुरू करण्यात आले.

- संतोष आंधळेमुंबई  : जे जे रुग्णालय परिसरातील डी. एम. पेटिट या १३० वर्षे जुन्या असलेल्या इमारतीत भुयार सापडले आहे. या ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय असून, भुयार सापडल्याने रुग्णालय परिसरातील कर्मचाऱ्यांत कुतूहल निर्माण झाले आहे. भुयाराची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आली आहे. 

रुग्णालय परिसराची नियमित पाहणी करणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण राठोड बुधवारी पाहणी करीत असताना त्यांना सध्या ज्या ठिकणी नर्सिंग कॉलेज आहे तिथे काही तरी असल्याचा संशय आला. त्यांनी त्यावरील झाकण उघडून पाहिले तर लांबलचक पोकळी असलेला भाग दिसला. कुतूहल म्हणून त्यांनी सुरक्षा रक्षकांना बोलावून आणखी पाहणी केली असता भुयार असल्याचे आढळले. आणखी पाहणी केली असता डी. एम. पेटिट इमारत ते मुटलीबाई इमारत असे २०० मीटरचे हे भुयार असून ते तीन भागांत विभागल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही इमारतींची निर्मिती १३० वर्षांपूर्वी केली असल्याची नोंद तेथील कोनशिलेवर आहे.

सर जे जे रुग्णालय १८४५ साली रुग्णांसाठी खुले करण्यात आले. त्याचदरम्यान वैद्यकीय शिक्षणासाठी ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजही सुरू करण्यात आले. या रुग्णालय परिसरात जुनाट ब्रिटिशकालीन अनेक इमारती आहेत. त्यातील अनेक इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात कोणत्याही इमारतीची डागडुजी करायची असल्यास पुरातत्त्व विभागाची परवानगी घ्यावी लागते. दोन वर्षांपूर्वी जे जे रुग्णालयाने १७५ वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी अनेक जुन्याजाणत्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. महाविद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना काही डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात कुठेतरी भुयार असल्याचे सांगितले होते. मात्र, कुठे होते हे कोणालाच माहीत नव्हते.  

टॅग्स :जे. जे. रुग्णालयमुंबई