उपनगरीय रेल्वेची श्वेतपत्रिका
By Admin | Updated: August 10, 2015 01:51 IST2015-08-10T01:51:18+5:302015-08-10T01:51:18+5:30
रेल्वे तोट्यात आहे आणि खर्चही वाढला आहे, अशी ओरड रेल्वेकडून होत असते. त्यामुळेच प्रवाशांना सोयी-सुविधा देताना आर्थिक समस्या येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून

उपनगरीय रेल्वेची श्वेतपत्रिका
मुंबई : रेल्वे तोट्यात आहे आणि खर्चही वाढला आहे, अशी ओरड रेल्वेकडून होत असते. त्यामुळेच प्रवाशांना सोयी-सुविधा देताना आर्थिक समस्या येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सतत सांगितले जाते. मात्र यातील वास्तव आता लवकरच प्रवाशांसमोर येणार आहे. महिन्याभरात उपनगरीय रेल्वेची श्वेतपत्रिका प्रवाशांसमोर येणार असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) देण्यात आली.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उपनगरीय रेल्वेमार्गाची श्वेतपत्रिका काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. हे काम एमआरव्हीसीकडून केले जात आहे. श्वेतपत्रिकेमुळे प्रवासी तसेच संघटना आणि लोकप्रतिनिधी यांना उपनगरीय रेल्वेची अचूक माहिती मिळेल. यात रेल्वे सेवा आणि सुविधांवर होणारा खर्च तसेच रेल्वेचे उत्पन्न यांचा ताळमेळ देण्यात येणार आहे. रेल्वेला होणारा नफा, तोटा याची सविस्तर माहितीही यात असेल, असे एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून स्वतंत्ररीत्या देण्यात येणाऱ्या सुविधा. एमआरव्हीसीचे प्रकल्प आणि त्यांना लागणारा कालावधी, खर्चही समोर येणार आहे.
सध्या श्वेतपत्रिकेवर अखेरचे काम सुरू असून,
मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठकांवर बैठका सुरू आहेत.
गेल्या पाच वर्षांत उपनगरीय रेल्वेचा संचित तोटा
४ हजार १५0 कोटींवर पोहोचला आहे. तसेच उपनगरीय रेल्वेला वीजही चढ्या दरात खरेदी करावी लागत आहे. हे पाहता उपनगरीय रेल्वेवर खर्चाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना सद्य:स्थिती सांगणे महत्त्वाचे असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
उपनगरीय स्थानके, सध्या असलेल्या सुविधा,
आव्हाने, प्रवाशांची सुरक्षा इत्यादी माहिती श्वेतपत्रिकेत देण्यात येईल. ही श्वेतपत्रिका रेल्वेच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. या माहितीमुळे प्रवाशांना रेल्वेच्या अडचणी समजतील. तसेच प्रवाशांनाही काही सूचना करण्याची संधी यातून मिळेल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.