पीओपी गणेशमूर्तींबाबत अभ्यास समितीची अनुकूलता; १ जून रोजी सीपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:56 IST2025-05-06T06:56:13+5:302025-05-06T06:56:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पीओपी मूर्तींच्या समुद्र वा मोठ्या नद्यांमधील विसर्जनाला कोणतीही हरकत नसावी, मात्र ही विसर्जनस्थळे मानव ...

पीओपी गणेशमूर्तींबाबत अभ्यास समितीची अनुकूलता; १ जून रोजी सीपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पीओपी मूर्तींच्या समुद्र वा मोठ्या नद्यांमधील विसर्जनाला कोणतीही हरकत नसावी, मात्र ही विसर्जनस्थळे मानव आणि पशूंच्या पाणीवापराच्या ठिकाणापासून दूर असावी, असा डॉ. अनिल काकोडकर अभ्यास समितीचा अहवाल राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सोमवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सादर केला. या अहवालावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा (सीपीसीबी) ला १ जून रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.
दिवसेंदिवस मूर्तींची संख्या आणि त्यांचा आकार वाढत आहे. यामुळे जलपर्यावरणाचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणस्नेही मूर्ती आणि त्यांच्यासाठी वापरला जाणारा रंग यांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. तसेच विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या उपयोगाला प्रोत्साहन देणे आवश्यक असून काही शहरांमध्ये हे कित्येक वर्षे सातत्याने चालू आहे. अशा पद्धतीने विसर्जन झालेल्या पीओपीचा पुनर्वापर शक्य आहे, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहेत. समुद्र, मोठ्या वाहत्या नद्या अशा मोठ्या जलस्रोतातदेखील पर्यावरणस्नेही रंगाने रंगविलेल्या पीओपीच्या मूर्ती विसर्जित करण्यास हरकत नसावी, असे निरीक्षण या समितीने नोंदवले आहे.
दोन महिन्यांपूर्वी परळ येथे झालेल्या संमेलनात मूर्तिकारांनी पीओपी मूर्ती बंदीसाठी सरकार आणि मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या कठोर अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला अभ्यास समिती गठित करण्याची विनंती केली होती. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभ्यास समितीने आपला अहवाल सादर केला.
मूर्तिकारांमध्ये आनंदोत्सव
पेण : न्यायालयात पीओपी मूर्तींबाबत अनुकूल अहवाल सादर झाल्यानंतर पेण, हमरापूर विभागासह राज्यातील मूर्तिकारांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हजारो कोटींच्या उद्योगावरील बेरोजगारीचे संकट दूर होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, सचिव कैलाश पाटील, मार्गदर्शक नितीन मोकल, कुणाल पाटील, राजन पाटील, हमरापूर गणेशमूर्ती संघटनेने यासाठी शासन दरबारी पाठपुरावाही केला. कारखान्यांचे रासायनिक सांडपाणी, सर्वत्र आढळणारे प्लास्टिक आदींमुळेही पर्यावरणाची हानी होत आहे. त्या तुलनेत पीओपीमुळे होणारी हानी अत्यल्प आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.