Join us  

दूरदर्शनवरून मिळणार विद्यार्थ्यांना धडे; शैक्षणिक प्रसारणासाठी शिक्षणमंत्र्यांची केंद्राकडे १२ तासांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 3:37 AM

केंद्राकडे दूरदर्शनवरील १२ तासांचा वेळ आणि रेडिओवरील रोज २ तासांचा वेळ राज्य शिक्षण विभागासाठी पत्र लिहून मागितला आहे.

मुंबई : १५ जूनपासून जेथे प्रत्यक्ष शाळा सुरू करता येणार नाहीत अशा ठिकाणी डिजिटल अभ्यासक्रमाची सुरुवात करणारा असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शैक्षणिक प्रसारणासाठी केंद्राकडे दूरदर्शनवरील १२ तासांचा वेळ आणि रेडिओवरील रोज २ तासांचा वेळ राज्य शिक्षण विभागासाठी पत्र लिहून मागितला आहे.

ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटरसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत किंवा ज्या दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमात यामुळे खंड पडणार नाही, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. शिवाय शाळा प्रत्यक्ष सुरू करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका पोहचणार नसून त्यांचे व्हर्च्युअल शिक्षण सुरू राहील अशी माहिती त्यांनी दिली.आॅनलाइन लर्निंग हा पर्याय असला तरी प्रत्येकाच्या आवाक्यातला नसल्याने शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागेल. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारकडे नॅशनल टेलिव्हिजनवरचा दिवसाचा १२ तासांचा कालावधी मागितला आहे. आॅल इंडिया रेडिओकडेही दोन तासांच्या स्लॉटची मागणी केल्याची माहिती त्यांनी टिष्ट्वट करून दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्राथमिक आणि माध्यमिक वर्गांसाठी यापूर्वीच एक हजारहून अधिक तासांचे डिजिटल लर्निंग आणि इंटरॅक्टिव्ह कंटेंट एकत्र केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी १२ तासांचे दैनंदिन शिक्षण साहित्य डीडीच्या दोन वाहिन्यांच्या माध्यमातून प्रसारित करायचे आहे. दोन तासांचे प्रसारण आॅल इंडिया रेडिओवरूनही व्हावे अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्राथमिक वर्गांसाठीचा कंटेंट मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेत उपलब्ध करण्याचा विचार असून त्याचे नियोजन अद्याप सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :विद्यार्थीशिक्षण