Join us
Daily Top 2Weekly Top 5

फोन, एसएमएस, ऑनलाईनद्वारे विद्यार्थ्यांना निकाल मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 17:52 IST

संचारबंदीच्या काळात शिक्षक शाळेत पोहचणार कसे ?  : निकालपत्रक तयार करण्यासाठी सूचना मिळाल्यानंतर शिक्षकाकडून सवाल उपस्थित

मुंबई : पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या निकालासंदर्भात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी दूरध्वनी, एसएमएस व अन्य ऑनलाईन पद्धतींनी विद्यार्थ्यांना लवकरात लवकर निकाल कालवावा जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणताही संभ्रम राहणार नाही. त्यांना उपलब्ध साहित्याच्या आधारे पुढील शैक्षणिक वर्षाचा अभ्यास करता येणे शक्य होईल अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांनी दिल्या आहेत. मात्र यामुळे शिक्षकच्या अडचणीत वाढ झाली आहे. वर्षभरातील घटक चाचणी, सहामाही निकालाची कागदपत्रे, विद्यार्थ्यांची माहिती सर्व शाळांमध्ये  असताना घरी बसून शिक्षकांनी निकालाची कार्यवाही कशी करायची? शिवाय संचारबंदीच्या काळात शाळांत पोहचायचे तरी कसे असे अनेक प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित होत आहेत.पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधी शाळांनी , कनिष्ठ महाविद्यालयांनी निकाल पत्राबाबतची कार्यवाही पूर्ण करावी असे पत्रात म्हटले आहे. मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून नवीन शैक्षणिक वर्षाबाबतची काही माहिती देण्यात आली नाही. आत्ताच जे शिक्षक त्यांच्या मूळ गावी नाहीत त्यांना गावी जाण्याची परवानगी मिळाली आहे. मग त्यांनी त्यांच्या व्हेकेशन पिरेड मध्ये काम कसे करावे ? रेड झोनमध्ये असलेल्या शिक्षकानांतर शाळांमध्ये पोहचणे ही कठीण आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांनी निकालपत्रक कसे तयार करावेत असा प्रश्न शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी उपस्थित केला आहे.अनेक शिक्षकांचे १० वी बोर्डाचे पेपर देखील शाळेतच आहेत ते तपासून नियमकांकडे कसे पाठवावे याबाबतचा निर्णय अजूनही राज्य मंडळाने घेतलेला नसल्याने दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शाळा व शिक्षकांपुढील अडचणी पाहता निकालपत्र पालकांना देण्याची घाई करू नये अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत नोंदवही व प्रगतीपत्रकातील नोंदी करणेबाबत शिक्षकामध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात संचारबंदीच्या सूचना आणि शिक्षकांची सुरक्षितता यांचा विचार करून योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिक्षक करत आहेत.

टॅग्स :परिणाम दिवसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसशिक्षण क्षेत्र