Join us

पेईंग गेस्ट ठेवण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्यांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:10 IST

विमानतळ पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : पेईंग गेस्ट म्हणून फ्लॅट देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्याला हजारोंचा चुना लावल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तक्रारदार अभिनीत सिंग (२०) हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असून, दिल्ली आयआयटीमध्ये तिसऱ्या वर्षांत शिक्षण घेत आहे. यादरम्यान बीकेसीच्या एका कंपनीमध्ये त्याला दोन महिन्यांची इंटर्नशिप मिळाली होती. त्यासाठी त्याने नो ब्रोकर ॲपवर पेईंग गेस्ट म्हणून रूम मिळावी, यासाठी सर्च केले. ज्यात विलेपार्ले पूर्वेकडील सुविधा पर्ल सोसायटीमध्ये वन बीएचके फ्लॅट भाड्याने असल्याचे त्याला दिसले. त्यानुसार त्याने तेथे दिलेल्या मोबाइल क्रमांकावर फोन केला. तो कॉल समोरच्या व्यक्तीने उचलला नाही. 

याउलट व्हॉट्सॲप चॅटमध्ये एक अन्य नंबर पाठवत त्यावर मला संपर्क कर असे त्याने विद्यार्थ्याला सांगितले. त्या मोबाइलवर कॉल केला असता अरविंद नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फ्लॅटला भेट देण्यासाठी व्हिजिटिंग कार्ड बनवावे लागेल, ज्यासाठी ८ हजार १०० रुपये भरावे लागतील, असे विद्यार्थ्याला सांगितले. 

विद्यार्थ्याने कार्ड बनवायची तयारी दाखवल्यावर जैन नावाच्या व्यक्तीचा नंबर पाठवत त्याला व्हॉट्सॲपवर संपर्क साधायला सांगण्यात आले. या जैनने थोडे-थोडे करत विद्यार्थ्याकडून एकूण ५७ हजार १०० रुपये लाटले. मात्र, त्याला फ्लॅट दिला नाही आणि विद्यार्थ्याने अखेर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी दोघांविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ३(५), ३१८(४), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस