कापड बाजार शाळेसाठी विद्यार्थ्यांना दीड तासाच्या पायपिटीची ‘शिक्षा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:40 IST2025-12-24T12:40:06+5:302025-12-24T12:40:32+5:30
पालकांचा संताप : खेळाच्या मैदानाची वानवा, पिण्यासाठी घरूनच पाणी नेण्याची वेळ

कापड बाजार शाळेसाठी विद्यार्थ्यांना दीड तासाच्या पायपिटीची ‘शिक्षा’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहीम रोड पालिका शाळेची इमारत धोकादायक ठरविल्यानंतर ३५० विद्यार्थ्यांना माहीम येथील पॅराडाईज सिनेमासमोरील कापड बाजार एसआरए रहिवासी इमारतीत स्थलांतरित केले. या शाळेत धारावीहून रोज दीड तास पायी येणाऱ्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शारीरिक त्रास सहन करावा लागत असून पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
न्यू माहीम रोड शाळेची इमारत २४ नोव्हेंबर २०२४ रोजी पालिकेने नेमलेल्या वास्तुविशारद पेंटाकल कंपनीने धोकादायक ठरविली. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना माहीम पोलिस वसाहतीत, तर माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना सायन येथील पालिका शाळेत सहा किलोमीटर अंतरावर हलविण्यात आले. उर्वरित ३५० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी कापड बाजारातील एसआरए रहिवासी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खोल्यांत शाळा सुरू आहे. या ठिकाणी शाळेसाठी कोणतेही खेळाचे मैदान उपलब्ध नाही.
दप्तर, पाण्याच्या बाटल्यांच्या ओझ्यामुळे विद्यार्थी त्रस्त
दुपारच्या सत्रात अनेकदा पाणी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना घरातून दोन बाटल्या आणाव्या लागतात. हे ओझे घेऊन विद्यार्थी त्रासले आहेत, असे पालक सिद्री फारुकी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि शैक्षणिक विकास समांतर व्हावा, यासाठी मैदान आवश्यक आहे. न्यू माहीम रोड शाळा जाणीवपूर्वक धोकादायक ठरविल्यामुळे विद्यार्थ्यांना इकडे येण्यासाठी ही पायपीट करावी लागत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्या प्रणाली राऊत यांनी केला.
आमच्या तिसरी, चौथीच्या मुलांना रोज येऊन जाऊन दीड तासाची पायपीट करावी लागते. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो. पालिकेने त्वरित उपाय करावा.
- रेशमा नदीम शेख, पालक
पाण्याची टाकी साफ करायला घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी मिळाले नाही; परंतु आता पाणीपुरवठा सुरळीत आहे. विद्यार्थ्यांना मोफत बस किंवा शाळेपासून शीतलादेवी स्टॉपपर्यंत मेट्रोने मोफत पास देण्याचा प्रस्ताव देणार आहेत.
- सुजाता खरे, शिक्षणाधिकारी, पालिका
शारीरिक विकास खुंटला, आजाराला आमंत्रण
विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास न झाल्यास थकवा, आजारपण वाढते, एकाग्रता कमी होते. अभ्यासातील गती मंदावते आणि आत्मविश्वासावर नकारात्मक परिणाम होतो.