धक्कादायक! लंगडी खेळता खेळता विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू; शाळेतील घटनेनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 07:33 IST2024-08-31T07:32:58+5:302024-08-31T07:33:10+5:30
खेळता खेळता अचानक तो खाली कोसळला आणि त्याला आकडी आली. यामध्ये तो बेशुद्ध पडला.

धक्कादायक! लंगडी खेळता खेळता विद्यार्थ्याचा कोसळून मृत्यू; शाळेतील घटनेनं खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शाळेत पीटीच्या तासाला वर्गमित्रांसोबत खेळत असताना एक ८ वर्षांचा विद्यार्थी अचानक कोसळला. शिक्षकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले; त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
शिवांश मनोज झा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कांदिवलीच्या निर्मला इंग्लिश स्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी दुपारी ३च्या सुमारास शिवांश विद्यार्थ्यांसोबत लंगडी खेळत होता. खेळता खेळता अचानक तो खाली कोसळला आणि त्याला आकडी आली. यामध्ये तो बेशुद्ध पडला.
सीसीटीव्ही फूटेज तपासले...
शिक्षकांनी त्याला रुग्णालयात नेले. यासंबंधी त्याच्या पालकांनाही माहिती दिली. त्या रुग्णालयातून त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवले. या घटनेची माहिती समतानगर पोलिसांना मिळताच एक पथक रुग्णालयात, दुसरे शाळेत दाखल होऊन त्यांनी चौकशी केली. शाळेतील सीसीटीव्ही फूटेजची पडताळणी केली असता शिवांश खेळताना पडल्याचे स्पष्ट दिसले. त्यामुळे या घटनेत संशयास्पद बाब आढळली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.