‘त्या’ विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:17 IST2017-10-15T02:17:39+5:302017-10-15T02:17:48+5:30
एफआयआरलाच सत्य मानून विद्यार्थ्याला महाविद्यालय काढू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने एका कॉम्प्युटर इंजिनीअर विद्यार्थ्याला दिलासा दिला.

‘त्या’ विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढता येणार नाही
मुंबई : एफआयआरलाच सत्य मानून विद्यार्थ्याला महाविद्यालय काढू शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने एका कॉम्प्युटर इंजिनीअर विद्यार्थ्याला दिलासा दिला. विद्यार्थ्याला महाविद्यालयातून काढण्याचा व्यवस्थापनाने निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.
एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप संबंधित २१ वर्षीय विद्यार्थ्यावर आहे. याप्रकरणी जूनमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनीअरिंग कॉलेजने त्याला आॅगस्टमध्ये महाविद्यालयातून काढले. त्यापूर्वी विद्यार्थ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी न दिल्याने त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठापुढे होती. विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदविण्यात आला, या कारणास्तव संस्थेने त्याला चौकशी न करता काढून टाकले. अन्य शब्दांत सांगायचे तर त्याला एकप्रकारे शिक्षा केली. त्यामुळे संस्थेचा आदेश नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन आहे. याचिककर्त्याने महाविद्यालय आवारात बेकायदा कृत्य केलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले.