गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला मारहाण; शिक्षिकेविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 09:11 IST2025-10-28T09:03:15+5:302025-10-28T09:11:10+5:30
घाटकोपर पोलिसांनी एका खासगी शिकवणीतील शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

गृहपाठ न केल्याने विद्यार्थिनीला मारहाण; शिक्षिकेविरोधात गुन्हा
मुंबई : गृहपाठ न केल्याच्या कारणावरून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी एका खासगी शिकवणीतील शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनानक नगर येथील ‘खडका क्लासेस’ या खासगी शिकवणीत ही विद्यार्थिनी शिकत होती. तेथील शिक्षिका लक्ष्मी खडका यांनी दिवाळी सुटीपूर्वी सर्व विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. मात्र, संबंधित विद्यार्थिनीने गृहपाठ अपूर्ण ठेवला. यामुळे रागावलेल्या लक्ष्मी खडका यांनी विद्यार्थिनीवर छडीने मारहाण केली. घरी परतल्यावर विद्यार्थिनीने ही घटना पालकांना सांगितल्यावर त्यांनी शिक्षिकांकडे जाब विचारला. त्यावेळी शिक्षिकांनी, “गृहपाठ केला नाही तर भविष्यातही अशीच शिक्षा मिळेल, तुम्हाला काय करायचे ते करा,” असे उत्तर दिल्याचे पालकांनी सांगितले. ही घटना गेल्या शनिवारी (दि. १९ ऑक्टोबर) घडली. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षिका लक्ष्मी खडका यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे.