नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:25 AM2019-12-21T05:25:46+5:302019-12-21T05:26:14+5:30

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत शांततेत आंदोलन : मोदी-शहांच्या विरोधात घोषणाबाजी

Strong protests against citizenship amendment act | नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार निदर्शने

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जोरदार निदर्शने

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि ठाणे शहरातील राबोडी या परिसरात केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात शुक्रवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले. नमाजपठण झाल्यानंतर निघालेल्या मोर्चामुळे या शहरांमधील वाहतूकव्यवस्था विस्कळीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मोर्चात महिला व तरुणांची संख्या लक्षणीय होती.


भिवंडी, कल्याण व ठाण्यातील राबोडी या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी मोर्चा काढण्यास मज्जाव केल्याने विशिष्ट ठिकाणी जमा होऊन जमावाने निदर्शने केली. अंबरनाथमध्येही पोलीस मोर्चाला आडकाठी करीत होते. मात्र, मोर्चाच्या आयोजकांनी माघार न घेतल्याने कडक पोलीस बंदोबस्तात येथील कोहोजगाव मशिदीपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. भिवंडीत पालिका मुख्यालयासमोरील धर्मवीर आनंद दिघे चौकातील निदर्शनात हजारो लोकांनी भाग घेतला. निदर्शकांच्या हातात राष्ट्रध्वज आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे होती. निदर्शक ‘भारतमाता की जय’, ‘इन्किलाब झिंदाबाद’ याबरोबरच मोदी-शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. निदर्शनांमुळे भिवंडी शहरातील केडीएमटी व टीएमटीची बससेवा थांबवण्यात आली होती.


कल्याणच्या बाजारपेठ हद्दीतील घासबाजार भागातील गफूरडोण चौकात निदर्शने करण्यात आली. आयोजकांनी मागितलेली मोर्चाची परवानगी नाकारण्यात आली. ठाण्यातही राबोडीत जामा मशीद येथे निदर्शने करण्यात आली. मोर्चे व निदर्शनांमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांमधील ही आंदोलने अत्यंत शांततामय मार्गाने सुरू असल्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व आंदोलनाच्या आयोजकांचे कौतुक केले.


वसईत सर्वधर्मीयांचा शांततेत मूकमोर्चा
वसई : शुक्रवारी वसईत सर्वधर्मीय संविधान बचाव समितीच्या वतीने वसई तहसीलदार कार्यालयावर शांततेत मूकमोर्चा काढून केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. वसई पापडी येथील हुतात्मा स्मारक, टी.बी. कॉलेज येथून काढण्यात आलेल्या या मूक मोर्चामध्ये जवळपास २० हजारांच्या संख्येने सर्वधर्मीय बांधव आणि मुस्लिम समाजबांधवांनी मोठा सहभाग नोंदवला होता. वसई तालुक्याच्या पूर्व-पश्चिम भागातून समस्त मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने हजर होता. शुक्र वारी दुपारी ३ वाजता वसई पूर्व येथून आणि पुढे वसई शहरातील पापडी भागात मुख्य रस्त्यावरून हा मूक मोर्चा वसई तहसीलदार कार्यालयावर धडकला.


या वेळी केंद्र सरकार, पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता, तर दुपारी वसईच्या पूर्व आणि पश्चिम भागातील बहुतांशी भागातून निघालेल्या या मोर्चामुळे वसई, नालासोपारा, विरार आदी शहरवासीयांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. हा मूक मोर्चा साधारण संध्याकाळी ६ वाजता वसई तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर पोहचल्यावर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर केंद्र सरकारचा निषेध नोंदवत आपल्या मागण्यांचे निवेदन वसई तहसीलदारांना देण्यात आले.


पनवेलमधे पाच हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
पनवेल : देशभरातील नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात जनआंदोलन पेटले आहे. शुक्रवारी पनवेल शहरातील मुस्लिम बांधवांनी या कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले. यावेळी पाच हजारांहून अधिक मुस्लिम बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.
तळोजात या कायद्याविरोधात दोन दिवसापूर्वी मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले होते. शुक्रवारी पनवेल महापालिकेजवळील मैदानावर मुस्लिम बांधवांनी आंदोलन करीत केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये, म्हणून पनवेल शहर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे मोर्चा कार्यालयापर्यंत पोहोचू शकला नाही. अखेर शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन देऊन आपला निषेध नोंदवला.


माणगावमध्ये आंदोलनादरम्यान चोख बंदोबस्त
माणगाव : रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून माणगाव येथे बहुजन मुक्ती क्रांती मोर्चाच्या वतीने माणगाव प्रांत कार्यालयसमोर नागरिकत्व सुधारणा कायदा व नवीन नागरिकत्व नोंदणी विरोधात शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याभरातून पाली, रोहा, म्हसळा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, माणगाव तालुक्यातून असंख्य मुस्लिम, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य लोक यावेळी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान बंदोबस्तासाठी दीडशे पोलिसांसह १५ अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.


वडाळा आणि कुर्ला येथेही निदर्शने
मुंबई : वडाळ्यातील चार रस्ता येथील नॅशनल मार्केटसमोर रझा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सुधारित नागरिकत्व विधेयकास विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी नॅशनल मार्केटसमोरील चार रस्त्यावर मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आले होते. हातात तिरंगा, तसेच नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे फलक व ‘अहिंसा परमो धर्म’ अशा आशयाचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली.भारत धर्मनिरपेक्ष देश असून, केंद्र सरकारने मुस्लीम समाजावर अन्याय करणारा कायदा आणला आहे. हा कायदा रद्द केला जावा, अशी मागणी रझा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आली. रझा फाउंडेशनच्या वतीने उपस्थितांना मुंबईत शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. रस्त्यावर हजारोंच्या संख्येने नागरिक जमल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती. कुर्ला पूर्व येथेदेखील केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. शुक्रवारच्या नमाज पठणानंतर कुर्ला स्थानकासमोर मोठ्या संख्येने आंदोलकांतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी एनआरसी व सीएए रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Strong protests against citizenship amendment act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.