विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तसेच शिक्षकांच्या सन्मानाच्या दृष्टीने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:47 AM2019-09-16T05:47:08+5:302019-09-16T05:47:17+5:30

शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणजे पाठ्यपुस्तके आहेत.

Strive for holistic development of students, as well as respect for teachers | विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तसेच शिक्षकांच्या सन्मानाच्या दृष्टीने वाटचाल

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, तसेच शिक्षकांच्या सन्मानाच्या दृष्टीने वाटचाल

googlenewsNext

- सीमा महांगडे
शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षणाचे सर्वोत्कृष्ट माध्यम म्हणजे पाठ्यपुस्तके आहेत. त्यामुळे क्रमाक्रमाने पाठ्यपुस्तके बदलण्याचा निर्णय हा शालेय शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. यंदा दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलून नवीन पुस्तके बाजारात आली आहेत तर बारावीच्या बदलत्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके आणण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ती बाजारात येतील. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षकांच्या सन्मानाच्या दृष्टीने शिक्षण विभागाची वाटचाल सुरू आहे, असा विश्वास एक शिक्षिका म्हणून सुरुवात केलेल्या आणि आता मंत्रालयाच्या शिक्षण विभागातील विशेष कार्यकारी अधिकारी असलेल्या प्राची साठे यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’मध्ये व्यक्त केला.

>अंतर्गत गुणांचा निर्णय घाईत : अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात थोडी घाई झाली असे वाटते. अंतर्गत गुणांचा फुगवटा दूर करण्यासाठी ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्या परिणामांचा निकाल पाहण्यासाठी अजून थोडी वाट पहिली असती तरी चालले असते, असे माझे वैयक्तिक मत आहे. यामुळे विशेषत: गणित आणि विज्ञानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळून त्यांच्या संकल्पनांना विस्तारण्यास अधिक मदत झाली असती.
पाठ्यपुस्तक निर्मितीमधील महत्त्वाचे बदल कोणते?
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल व त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशा दृष्टीने सरकार पातळीवर प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणजे कृतिपत्रिका. कृतिपत्रिका, पाठ्यपुस्तकातील बदल यातून चांगला आणि कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडणार आहे. मुलांचा स्वभाव, त्यांची शिकण्याची पद्धत, सभोवतालचं वातावरण, ज्ञानरचनावाद याचा विचार करून पाठ्यपुस्तक पुनर्रचना करण्यात येत आहे. एनसीएफ, बालकांचा मूलभूत शिक्षण हक्क, एससीएफ, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या सगळ्याचा आधार घेत पाठ्यपुस्तकांत भरीव बदल करण्यात आले आहेत.
बालभारती आणि शिक्षण विभागासमोरील आव्हाने कोणती?
राज्यस्तरीय कार्यशाळा, शिक्षकांची प्रशिक्षणे झाली. समाजातील सर्व घटकांमधून बदलांवर मते मागविण्यात आली. बोलीभाषा, दैनंदिन जीवनातील प्रसंग, लिंगभावात्मक न्याय, मुलामुलींचे समाजिकीकरण अशा सर्व घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आला. हे निर्णय घेण्यासाठी आणि पुढे सरकविण्यासाठी विशेष कार्यकारी पदाची खूप मदत झाली. एक शिक्षिका म्हणून मला विद्यार्थी आणि शिक्षकांची बाजू सांभाळत शिक्षण विभागासाठी आवश्यक त्या गोष्टीचा समन्वय मंत्रालयीन स्तरावर करून घेता आला ही जमेची बाजू आहे. विविध भाषांमधील तज्ज्ञ शिक्षक मिळणे, पुस्तकांसाठी मुद्रितशोधक मिळणे अशी आव्हाने बालभारती व शिक्षण विभागाकडे आहेत, मात्र ती आपण बाजूला सारून पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया पूर्ण करत आहोत.
बालभारतीच्या कॉपीराइट्समुळे फायदा झाला का?
बालभारतीची पुस्तके बाजारात येण्यापूर्वीच त्यावर आधारित गाइड बाजारात उपलब्ध होत होती. अनेक खासगी शालेय पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशने बालभारतीच्या पुस्तकांची नक्कल करून स्वत:चा ब्रॅण्ड लावून पुस्तके बाजारात नेत होती. मात्र कॉपीराइट धोरणामुळे याला चाप बसला. बालभारतीची नक्कल करून बाजारात येणारी पुस्तके ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाली आहेत. शिवाय इतर शैक्षणिक धोरणे आणि कामांसाठी आवश्यक महसूलही यातून मिळत आहे.
विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा मजकूर पोहोचणार नाही यासाठी काही?
बालभारतीच्या पुस्तकांचा आधार घेऊन शैक्षणिक अ‍ॅप अथवा सॉफ्टवेअर्स तयार केली जातात. ही सॉफ्टवेअर्स अनेक कंपन्या विद्यार्थ्यांना विकतात. सध्याच्या काळात अशा सॉफ्टवेअर्स आणि अ‍ॅप्सच्या संख्येत वाढ झाली आहे. या कंपन्यांनाही बालभारतीच्या पुस्तकातील मजकूर वापरायचा असेल, तर त्यांनाही परवानगी घ्यावी लागणार आहे. यामुळे अशा प्रकारातील शैक्षणिक साहित्यालाही चाप बसला आहे. विद्यार्थ्यांपर्यंत किमान चुकीचा आणि निरर्थक मजकूर पोहोचणार नाही हा उद्देश यातून साध्य होत आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात किती शाळा प्रगत झाल्या? शिक्षणाच्या वारीचे उद्दिष्ट काय?
शिक्षकाच्या सन्मानाचे एक डॉक्युमेंट म्हणजे प्रगत शैक्षणिक शाळा अशी याची व्याख्या करता येईल. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ४८ हजार ५६१ शाळा प्रगत झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक सुविधा जागतिक दर्जाच्या व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने हा उपक्रम २०१५ साली सुरू केला. या उपक्रमामध्ये मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येते. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी वर्षातून ३ चाचण्या घेण्यात येतात. यामुळे शिक्षकांना विशिष्ट पद्धतीने शिकविण्यास
मदत होते. वाचन, लेखन,
संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया
या शिक्षणासाठीच्या मूलभूत
क्षमता आहेत.
तंत्रज्ञानाची मदत कशी घेत आहात?
तंत्रज्ञानाची मदत घेऊन शिक्षण कसे आनंददायी करता येते, टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य, जादूच्या कांडीद्वारे गणिताचे दिले जाणारे धडे इथपासून ते बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि संपूर्ण सूर्यमाला मोबाइलद्वारे शिकविण्यासाठी शिक्षकांनी तयार केलेले अ‍ॅप अशा नवनवीन प्रयोगांचा समावेश असलेली शिक्षणाची वारी राज्यातील शिक्षकांसाठी व्यासपीठ आहे. शिक्षक कशाप्रकारे शिकविण्याच्या पद्धतीत बदल घडवून शाळा प्रगत करत आहेत याचे प्रात्यक्षिक शिक्षणाच्या वारीमधील स्टॉल्समधून दिसते. गणित, इंग्रजी, विज्ञानासह मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, किशोरवयीन आरोग्य विज्ञान, कृतियुक्त विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन अशा विषयांमध्ये तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्ययन व अध्यापनातील बदल शिक्षक सादर करत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळा कशा महत्त्वाच्या ठरतील?
या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थी हा खऱ्या अर्थाने लोकल टू ग्लोबल करण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. यंदा ८२ शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू असून काही शाळांमध्ये विद्यार्थी वेटिंग लिस्टवर प्रवेशासाठी आहेत. पालकांनी शिक्षक न होता पालक म्हणूनच मुलांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घ्यावा, मुलांच्या वयासह बौद्धिक पातळीचा विचार करूनच त्यांना शिक्षण देणे गरजेचे असून त्याबाबतचा प्रयत्न महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्डाच्या माध्यमातून केला जात आहे.
मराठी वाचविण्यासाठी योजनेचा हातभार लागेल?
मराठी वाचविण्यासाठी या योजनेचा मोठा हातभार पुढील काही वर्षांत नक्कीच लागणार आहे. मुलांच्या बुद्धीला झेपेल तितकाच अभ्यास त्यांच्याकडून करवून घेतल्यास शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होऊ शकेल. इंटरनॅशनल बोर्डाचे इंग्रजी माध्यमातील शिक्षण, डिजिटलाइज्ड वर्गखोल्या ही नवी शिक्षणपद्धती पालकांना आत्मसात झाली असली तरी त्याला छेद देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाने या शाळांच्या माध्यमातून सुरू केला आहे. गुणवत्तेला अग्रस्थानी ठेवून मेरीटचा शिक्षकच विद्यार्थ्यांना कसा शिकवेल या उद्देशासाठी पवित्र पोर्टलची संकल्पना आणण्यात आली. तिचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला आहे. लवकरच याचा दुसरा टप्पाही पूर्ण होऊन शिक्षकांना मदत होऊ शकणार आहे.
 

Web Title: Strive for holistic development of students, as well as respect for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.