Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी रस्त्यावर, सामान्यांचे हाल; आरोग्यसेवेचे तीनतेरा, प्रशासकीय कामांचा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 05:50 IST

आरोग्यसेवा विस्कळीत झाली. शासकीय कार्यालये ओस पडल्याने कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाती परत जावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून शासकीय-निमशासकीय, शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाल्याने राज्यातील शासकीय रुग्णालयांतील आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. शासकीय कार्यालये ओस पडल्याने शासकीय कामासाठी आलेल्या लोकांना रिकाम्या हाती परत जावे लागले.

राज्यातील आरोग्य कर्मचारी संपात सहभागी असल्याने प्रशिक्षणार्थी परिचारिका व कंत्राटी कर्मचारी यांच्या मदतीने केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही रुग्णांना घरी जाण्याचा सल्ला दिला जात आहे. बाह्यरुग्ण विभागाची सेवा पूर्णत: कोलमडल्याचे चित्र आहे. 

कर्मचाऱ्यांअभावी सीटी स्कॅन, एक्स-रे किंवा तत्सम अवांतर  सेवाही ठप्प झाल्या आहेत. तोकड्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अशा सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने या ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाहायला मिळाले. कोल्हापुरात कंत्राटी कर्मचाऱ्यांशिवाय व्हाइट आर्मी या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णसेवेत मदत केल्याचे दिसून आले. 

ठिकठिकाणी निदर्शने

राज्यातील विविध कार्यालयांबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत काम बंद ठेवले. त्यामुळे कामकाज ठप्प झाल्याचे  चित्र  पाहायला मिळाले. 

आंदोलनात शिक्षकही 

- या बेमुदत संपामध्ये शिक्षक संघटनांनीही सहभाग घेतला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. मात्र, शिक्षकांनी परीक्षा सुरळीत होण्यासाठी सहकार्य दिले असून उत्तरपत्रिका तपासणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

- सर्वच शिक्षक संपात सहभागी असल्याने दुसऱ्या दिवशीही सर्व शाळा बंद होत्या. दरम्यान, दहावी व बारावी परीक्षेसाठी सहकार्य करण्याची भूमिका शिक्षकांनी घेतलेली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संपनिवृत्ती वेतन