Join us  

पावसाळ्यात चौपाट्यांवर कडक सुरक्षा; अग्निशमन दलाची फ्लड रेस्क्यू टीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 2:19 AM

पावसाळ्यात गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

मुंबई :पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असल्याने मान्सूनपूर्व कामांसाठी शेवटचा आठवडा उरला आहे. पावसाळ्यात समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने महापालिकेने मुंबईतील सहा प्रमुख चौपाट्यांवर ९४ जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत अग्निशमन दलाची ‘फ्लड रेस्क्यू टीम’ही चौपाट्यांवर मदतीला असणार आहे. या पथकाने गिरगाव चौपाट्यांवर या मदतकार्याची चाचणी केली.

पावसाळ्यात गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा चौपाट्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र या काळात समुद्र खवळलेला असल्याने पोहायला जाणाºया अनेकांच्या जीवावर बेतते. या धोक्याबाबत समुद्रकिनारी फलक लावूनही मुंबईकर त्याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात समुद्रकिनाºयावरील सुरक्षा वाढविण्यात येते. यावर्षी चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या माध्यमातून ९४ जीवरक्षक तैनात ठेवण्यात येत आहेत.

मात्र मोठी दुर्घटना किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी आता अग्निशमन दलाच्या रेस्क्यू टीमची मदत दिली जाणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी सांगितले. पावसाळ्याला अवघे काही दिवस उरले असल्याने वीकेंडला शनिवार-रविवारी या पथकाची चाचणी सुरू असते. या पथकाला जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री देण्यात येणार आहे.

समन्वयातून होणार काम...

मुंबईत अतिवृष्टीच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पालिका कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या माध्यमातूनही बचावकार्य केले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यास अग्निशमन दलाचे सहकार्य करण्यासाठी जीवरक्षक यापुढे मदतीला येणार आहेत. फ्लड रेस्क्यू टीमला शहरातील बचावकार्यासाठी जादा मनुष्यबळ-सहकार्याची गरज असेल तेव्हा जीवरक्षक सहकार्य करतील,अशा समन्वयातून काम केले जाणार आहे.

 

येथे तैनात फ्लड रेस्क्यू टीमअग्निशमन दलाची फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक, वांद्रे, कुर्ला, मालाड, दहिसर आणि गोराई येथील अग्निशमन केंद्रांतून घटनास्थळी धाव घेणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस