भटक्या श्वानांच्या त्वचारोगाचा नागरिकांच्या आरोग्याला धाेका; 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:50 IST2026-02-09T10:49:34+5:302026-02-09T10:50:29+5:30
श्वानाच्या संपर्कामुळे माणसांनाही त्वचारोगांचा धोका संभवतो. कुत्र्यांमधील काही संसर्गजन्य त्वचारोग माणसांमध्ये पसरू शकतात.

भटक्या श्वानांच्या त्वचारोगाचा नागरिकांच्या आरोग्याला धाेका; 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांचे आवाहन
मुंबई - सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या भटक्या श्वानांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणावर श्वान आढळून येतात. यापैकी अनेक त्वचारोगांनी ग्रस्त असल्याचे दिसून येते. खाज, खरुज (स्केबिज), दाद, बुरशीजन्य संसर्ग, केस गळणे, अंगावर खपल्या येणे, जखमांमधून पू आदी रोग कुत्र्यांमध्ये आढळतात. वेळेवर उपचार न झाल्याने हे आजार वाढत असून, त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे.
श्वानाच्या संपर्कामुळे माणसांनाही त्वचारोगांचा धोका संभवतो. कुत्र्यांमधील काही संसर्गजन्य त्वचारोग माणसांमध्ये पसरू शकतात. त्यामुळे खाज सुटणे, त्वचेवर लाल पुरळ येणे, दाद, फंगल इन्फेक्शन यासारख्या समस्या उद्भवतात. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण या आजारांना अधिक बळी पडतात. सार्वजनिक बागा, शाळांच्या परिसरात किंवा रस्त्यांवर खेळणारी मुले कुत्र्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता जास्त असते. संसर्ग पसरण्याचे मार्गही विविध आहेत. श्वानाला हात लावल्यास, त्यांच्या अंगावरील केस, त्वचेच्या कणांमधून संसर्ग पसरू शकतो.
रोग होण्यामागची कारणे
भटक्या कुत्र्यांना त्वचारोग अधिक होण्यामागे अनेक कारणे आहेत. अपुरा व असंतुलित आहार, स्वच्छतेचा अभाव, जंतसंसर्ग, सतत होणाऱ्या जखमा, पावसाळ्यातील ओलावा आणि पशुवैद्यकीय उपचार न मिळणे यामुळे हे आजार बळावतात. नियमित लसीकरण व औषधोपचार न झाल्याने समस्या गंभीर बनते.
अशी घ्या काळजी; तज्ज्ञांचे आवाहन
तज्ज्ञांच्या मते नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. भटक्या श्वानांना थेट स्पर्श टाळावा, मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवावे, संपर्कानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, त्वचे संदर्भात लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
भटक्या कुत्र्यांमध्ये आढळणारे स्केबीज व फंगल इन्फेक्शन हे झुनॉटिक म्हणजेच माणसांमध्ये पसरणारे आजार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक संपर्क टाळणे गरजेचे आहे आणि लक्षणे दिसताच त्वचारोगतज्ज्ञांकडून त्वरित उपचार घेणे महत्त्वाचे आहे. - डॉ. महेश अभ्यंकर