गांजा विक्रीचा अड्डा बंद
By Admin | Updated: May 20, 2014 02:50 IST2014-05-20T02:50:02+5:302014-05-20T02:50:02+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील पालिकेच्या प्रसाधनगृहाजवळ गांजा विक्रीचा अड्डा सुरू झाला होता.

गांजा विक्रीचा अड्डा बंद
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील पालिकेच्या प्रसाधनगृहाजवळ गांजा विक्रीचा अड्डा सुरू झाला होता. पोलीस स्टेशनजवळ असलेल्या या अड्ड्याविषयी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली आहे. येथील अड्डा बंद झाला असून अवैध व्यवसाय करणारे पोबारा झाले आहेत. भाजी मार्केटच्या गेटजवळ असणार्या प्रसाधनगृहाजवळ अनेक महिन्यांपासून हा अड्डा सुरू होता. या ठिकाणी एक कार उभी करण्यात आली होती. या कारमध्ये गांजाचा साठा करण्यात येत होता. ५० रुपयांमध्ये एक पुडी विकली जात होती. याच परिसरात पोलीस उपआयुक्त, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखेचे युनिट वन, एपीएमसी पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस स्टेशन व दोन पोलीस चौक्या आहेत. सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी याच रस्त्याने जात असतानाही बिनधास्तपणे हा व्यवसाय सुरू होता. दक्ष नागरिकांनी हा प्रकार ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिला होता. पोलीस ठोस कारवाई करत नाहीत. याविषयी आवाज उठविण्याची विनंती केली होती. गांजा विक्रीच्या अड्ड्याविषयी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच एकच खळबळ उडाली आहे. अवैध व्यवसाय करणार्यांनी तत्काळ तेथून पोबारा केला आहे. येथील गोडाऊन म्हणून वापर होत असलेली कारही गायब झाली आहे. महापालिकेच्या अधिकार्यांनीही या जागेची पाहणी करून येथील सर्वांना हुसकावून लावले आहे. अवैध व्यवसाय बंद झाल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)