झोपडीधारकांची दगडफेक; पोलिस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 10:20 IST2025-01-23T10:20:15+5:302025-01-23T10:20:23+5:30
Mumbai News: पश्चिम रेल्वे प्रशासनाने जोगेश्वरी रेल्वे फाटकाजवळील झोपड्यांवर सुरू केलेल्या कारवाईविरोधात बुधवारी झोपडीधारकांनी काढलेल्या बिऱ्हाड मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यामुळे त्यांनी दगडफेक केली.

झोपडीधारकांची दगडफेक; पोलिस जखमी
मुंबई - पश्चिम रेल्वे प्रशासनाने जोगेश्वरी रेल्वे फाटकाजवळील झोपड्यांवर सुरू केलेल्या कारवाईविरोधात बुधवारी झोपडीधारकांनी काढलेल्या बिऱ्हाड मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यामुळे त्यांनी दगडफेक केली. त्यात तीन पोलिस जखमी झाले. पोलिसांनी २० आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे प्रशासनाने विकासकामे हाती घेतल्यामुळे सुभाष रोडजवळील बेकायदा झोपड्यांना नोटिसा बजावल्या होत्या. झोपडीधारकांनी बांधकामे हटवली नाहीत. त्यामुळे पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक पोलिसांसह कारवाईसाठी आले होते. त्यावेळी झोपडीधारकांनी आंदोलन सुरू केले.
२० जणांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र जमावातून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. संतप्त जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
जोगेश्वरी पोलिसांनी याप्रकरणी २० जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
मोर्चा काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. दगडफेकीत जखमी झालेल्या एका पोलिसाच्या डोक्याला जखम झाल्याने दोन टाके घातले आहेत. तर दोन महिला पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे.
- सचिन गुंजाळ, पोलिस उपायुक्त, परिमंडळ १०