लॉकडाउन : शिवड़ीत दारूसाठी बारमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 15:27 IST2020-04-03T15:26:34+5:302020-04-03T15:27:58+5:30
लॉकडाउनच्या काळात दारू विक्री करणाऱ्यांचे शटरही डाउन असल्याने शिवड़ीत बारचे शटर तोडून दारू चोरी केल्याची घटना मंगळवारी घडली.

लॉकडाउन : शिवड़ीत दारूसाठी बारमध्ये चोरी
मुंबई : लॉकडाउनच्या काळात दारू विक्री करणाऱ्यांचे शटरही डाउन असल्याने शिवड़ीत बारचे शटर तोडून दारू चोरी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश सुरेश कुंबळे (३६) यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवडी येथील जया लिकर बारमध्ये ते व्यवस्थापक म्हणून काम करतात. २० मार्च पासून असलेल्या बंदीत लिकर बार व आस्थापना बंद ठेवण्यास सांगितल्याने त्या दिवसापासुन बारही बंद ठेवण्यात आला होता. कुंबळे दारुखाना परिसरात राहण्यास असल्याने सकाळी आणि रात्री बारकड़े लक्ष ठेवत असे.
३० तारखेला सकाळी नेहमीप्रमाणे तपासणीसाठी आले असताना बारचे शटर अर्धवट उघडलेले दिसले. त्यांनी याबाबत मालकाला सांगितले. मात्र लॉकडाउन मुळे मालकाला वांद्रे येथून पोहचणे शक्य झाले नाही. ३१ मार्च रोजी संध्याकाळी बार गाठले. तेव्हा बारमधून रोख रक्कमेसह २२ हजार रूपयांचा फक्त देशी दारूचा साठा चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. स्थानिकच कोणी तरी यात चोरी केली असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहेत.