नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
By मनीषा म्हात्रे | Updated: May 28, 2025 05:59 IST2025-05-28T05:59:21+5:302025-05-28T05:59:35+5:30
ठेकेदार विचारतात... ‘काला माल है क्या?’

नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
मनीषा म्हात्रे
मुंबई : पहिल्याच पावसाने मुंबईतील नालेसफाईची पोलखोल केली असताना नालेसफाईच्या आडून भ्रष्टाचाराचे एक मोठे रॅकेट सुरू असल्याचे चित्र ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे. प्रत्यक्षात नाल्यातील गाळ न काढता बांधकामाच्या साइटवरील माती आणि राडारोडा नाल्यातील गाळ म्हणून नोंद करून ठेकेदार देयके पास करून घेत आहेत. महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही हेराफेरी सुरू असल्याचे दिसून आहे.
विशेष म्हणजे नालेसफाईतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी सुरू केलेली ॲप सिस्टिमही ठेकेदारच ऑपरेट करत असल्याचे आढळले. त्यातच मुदत संपत आल्याने नालेसफाई झाल्याचे दाखविण्यासाठी बांधकामाच्या साइटवरील राडारोडा अर्थात ‘काला माल’ है क्या?, अशी विचारणा ठेकेदारांकडून केली जात आहे. भांडुप ते पवईपर्यंत विखुरलेल्या भांडुपच्या एस वार्डमध्ये ट्रक मालक आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश घाडगे यांच्या मदतीने हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. २३ ते २५ मे दरम्यान विविध ट्रकमधून हा माल नेण्यात आला. एस वार्ड अंतर्गत ५३ वाहने माल उचलण्याचे काम करतात. धक्कादायक म्हणजे मिठी नदी गाळ उपसा भ्रष्टाचाराप्रकरणी पसार असलेल्या भूपेंद्र पुरोहितच्या डी. बी. एंटरप्रायजेसला २० कोटींचे कंत्राट दिले.
मिठी नदी घोटाळ्यात नाव येताच पुरोहित पसार झाल्याची चर्चा आहे. मात्र, तो बाहेरून नालेसफाईची सूत्रे हलवत असल्याचे बोलले जाते.
मुदत संपत आल्याने काम पूर्ण झाल्याचे दाखविण्यासाठी बांधकाम साइटवरील ‘काळा माल’ उचलण्याची पळापळ वाढलेली दिसली.
नाल्यांची सफाई योग्यपणे न झाल्याने पहिल्याच पावसात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
पुरोहितचे जवळचे मानले जाणारे विनोद जोशी आणि ललित नावाची व्यक्ती सुपरवायझर म्हणून सर्व कामांवर लक्ष ठेवून आहे.
विक्रोळीच्या बांधकाम साइटवर ‘काळा माल’ घेण्यासाठी येणारी वाहने मुंबईच्या विविध वार्डातून येताना दिसली. त्यामुळे एस वार्डच नाही तर मुंबईच्या सर्वच वार्डमध्ये कमी जास्त प्रमाणात अशाप्रकारे काम सुरू आहे.
असा होता प्रवास
२३ मे २०२५
(१) दुपारी ३.४२ : छोट्या नाल्याशेजारी प्रवीणने १८१८ क्रमांकाच्या टेम्पोचा फोटो घेत ॲपमध्ये अपलोड केला.
(२) दुपारी ३.५४ : बांधकाम साइटवर दगड व ‘काळा माल’ भरून गाडी बाहेर आली.
(३) दुपारी ४.३८ : भरलेल्या टेम्पोचा फोटो, व्हिडीओ काढून टेम्पो वजनासाठी काट्याच्या दिशेने रवाना झाला.
(४) सायंकाळी ५.२३ : वजन काटा परिसरात एक टेम्पो चालकामार्फत लॉगशिट पाठविताच गाडी पालिकेच्या हरिओमनगरच्या वजन काट्यावर आली. तेथेही वजन झाल्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी लॉगशिटमध्ये माती, फ्लोटिंग आणि मिक्स कचऱ्यावर टीक करत गाडी पुढे रिकामी करण्यासाठी गुंदवलीच्या दिशेने रवाना केली.
(५) सायंकाळी ७.१३ : गाडी भिवंडीतील एका खासगी मालकाच्या जागेवर पोहोचली. तेथे माल उतरविताच तेथीलच कर्मचाऱ्याने फोटो, व्हिडीओ घेत ॲपवर अपलोड केले. तेथेही कोणी पालिका अधिकारी, कर्मचारी हजर नव्हते.
एकाच वेळी पालिका अन् महसूलची पावती
विक्रोळीच्या साइटवरून माल भरल्यानंतर तेथील ठेकेदाराने नियमाप्रमाणे महसूल विभागाची माती काढल्याची पावती म्हणजेच रॉयल्टी दिली. हाच माल पालिकेच्या लेखी गाळ म्हणून दाखवण्यात आल्याचे लाँग शिटवरून दिसून आले.
ठेकेदारच बनतो पालिका अधिकारी
ठेकेदारच अधिकाऱ्यांसाठी असलेले मोबाइल खरेदी करून लॉगशिट भरून घेतात. नाल्याजवळ रिकाम्या ट्रकचा फोटो घ्यायचा. ट्रक भरून आल्यानंतर केवळ मालाचा व्हिडिओ घेऊन अपलोड करण्यात येतो. नाल्यातील गाळ खरेच ट्रकमध्ये भरला आहे का? हे पालिका अधिकाऱ्यांकडून पाहिले जात नसल्याचे दिसले.
अधिकाऱ्याने एकाच वेळी लॉगशिटवर सही, शिक्का मारून ठेकेदारांच्या हाती सोपविल्याचे दिसून आले. पुढे माल भरून झाल्यानंतर लॉगशिट चालक किंवा त्याच्या सुपरवायझरकडे सोपविताना दिसले.
स्टिंगदरम्यान अन्य टेम्पो चालकाच्या हातून लॉगशिट पोहोचविण्यात आली. तेथे ना अधिकारी होता, ना कुणी कर्मचारी. मोबाइलचे लोकेशन व तोे ज्यांनी वापरणे अपेक्षित आहे त्यांच्या पर्सनल मोबाइलचे लोकेशन तसेच नाल्यावरील सीसीटीव्ही तपासले तर यातून खूप रंजक गोष्टी समोर येतील.
भाव काय?
बांधकाम साइटवरील माती, राडारोडा २८० रुपये टन या दराने ठेकेदारांना विकला जातो. एक ट्रक एकाच वेळी १६ ते १७ टन माती भरून नेतो. यामुळे ठेकेदार, मुकादम, कामगार तसेच नालेसफाईच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याचा खर्च वाचवतो. एका ट्रकमागे केवळ ५ ते ६ हजार रुपये खर्च केला जाताे.
कसे चालते रॅकेट?
ठेकेदार मालवाहू ट्रक मालकांशी संपर्क करत बांधकाम साइटवरील राडारोडा अर्थात ‘काळा माल’ आहे का, याची चौकशी करतात.
एखाद्या बांधकाम साइटवर गाळाप्रमाणे दिसणारा माल असेल तर त्याला ‘काला माल’ म्हणतात. तो दिसताच सुपरवायझर पाहणी करतो.
त्याच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच मुंबईतल्या विविध ठिकाणच्या बांधकाम साइटवरून हा माल उचलला जातो.
यामध्ये पालिका अधिकारी, वजन काट्यावरील अधिकारी आणि गाळ रिकामा करण्याच्या जागेवर सेटिंग करत व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले.